गोवा खबर

‘मराठी’साठी पाच लाख सह्यांचा निर्धार

Published

on

Spread the love

गोवा खबर : मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे दसऱ्यानिमित्त मोठ्या प्रमाणावर सह्या मोहिमेला सुरुवात करण्यात येत आहे. या मोहिमेतून पाच लाख सह्या गोळा करून राष्ट्रपतींना निवेदन सादर केले जाणार असल्याची माहिती समितीचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी प्रदीप तळावलीकर, अशोक नाईक, मच्छिंद्र चारी, विनायक चारी, रोशन सावंत, गोविंद देव, डॉ. अनिता तिळवे आदी मान्यवर उपस्थित होते. वेलिंगकर म्हणाले, गेल्या वर्षभरात आम्ही राज्यभरात प्रखंड मेळावे घेतले असून आता ही शेवटची लढाई आहे. मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही सरकारवर दबाव आणणार आहोत.

या मोहिमेतून युवक व महिला यांना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्यात येणार आहे. २० प्रखंडांमध्ये युवकांचे मेळावे घेऊन १० हजार युवक, तर मातृशक्ती मेळाव्यांतून १० हजार महिला सहभागी होतील. पुढे २० हजार सदस्यांचा सहभाग घेऊन तब्बल ४० हजार कार्यकर्त्यांची फौज उभारली जाणार आहे.

तसेच पंचायतींमधून ठराव मंजूर करून सरकारवर दबाव आणण्याची समितीची योजना आहे. आतापर्यंत ३० आमदारांना निवेदन दिले असून २० प्रखंड समित्याही स्थापन झाल्या आहेत. राज्यातील १६५ पंचायतींमधून ठराव मांडण्यासाठी मोहीम राबवण्यात येणार आहे.

Trending

Exit mobile version