गोवा खबर : आमदार गणेश गावकर यांनी बुधवारी पर्वरी येथील सभापतींच्या कार्यालयाचा अधिकृत ताबा घेतला. नुकत्याच शनिवारी पार पडलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात झालेल्या निवडणुकीत गावकर यांनी विरोधी गटाचे उमेदवार आमदार एल्टन डिकॉस्ता यांचा ३२ विरुद्ध ७ मतांनी पराभव करून सभापतीपद पटकावले होते.
गावकर यांनी पदभार स्वीकारताना आमदारांनी सभागृहात नियम व शिस्त पाळावी, अशी स्पष्ट समज दिली. त्यांचा हा ठाम संदेश राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, पदग्रहणापूर्वी काही दिवसांपूर्वी गावकर यांनी दिल्लीला भेट देऊन लोकसभा सभापतींशी चर्चा केली होती. त्यांच्या कार्यकाळाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.