गोवा खबर

हेरिटेज फॉर सस्टेनेबिलिटी फिल्म फेस्टिव्हल – गोव्याची संस्कृती व वारसा मोठ्या पडद्यावर

Published

on

Spread the love

~ १३ डॉक्युमेंटरी आणि शॉर्ट फिल्म्समधून गोव्याचा सांस्कृतिक, नैसर्गिक आणि मानवनिर्मित वारसा, पर्यावरणीय व सामाजिक बदल आणि शाश्वततेची गरज यांचा शोध.

गोवा खबर: गोव्याचा वारसा, संस्कृती, खाद्यसंस्कृती आणि जीवनशैली, हे सगळं पडद्यावर नद्या, संवाद, आठवणी आणि हास्याच्या रूपात एकत्र आलं ते म्हणजे हेरिटेज फॉर सस्टेनेबिलिटी फिल्म फेस्टिव्हल (HSFF) च्या माध्यमातून, जो नुकताच ईएसजी (Entertainment Society of Goa), पणजी येथे, संपन्न झाला.

हा फेस्टिव्हल वर्ल्ड टुरिझम डेच्या राज्यस्तरीय समारोपाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता. हेरिटेज फर्स्ट गोवा (HFG) ने ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा (TTAG), स्काल इंटरनॅशनल गोवा आणि गोवा टुरिझम यांच्या सहकार्याने याचे आयोजन केले.

फेस्टिव्हलमध्ये ब्रेड एन्ड बिलॉन्गींग, आयलंडस ऑन दी आयलंड, खारवण आणि दी बर्डमॅन ऑफ शॉरांव अशा १३ डॉक्युमेंटरी आणि शॉर्ट फिल्म्स दाखवण्यात आल्या. यामधून गोव्याचा सांस्कृतिक, नैसर्गिक व मानवनिर्मित वारसा, पर्यावरणीय आणि सामाजिक बदल यांचा वेध घेत, विशेषत: पर्यटन क्षेत्रात शाश्वततेची गरज अधोरेखित करण्यात आली.

“आमची दृष्टी गोव्याचा नैसर्गिक आणि वास्तु  वारसा जपणे आणि साजरा करणे आहे. पण आम्हाला असं जाणवलं की वारसा म्हणजे फक्त स्मारके, इमारती किंवा रचना नाहीत. तो आपला राहणीमान, जीवनशैली, आपण केलेली निवड आणि पुढच्या पिढीला दिलेली मूल्यं आहेत. शाश्वतता म्हणजे जिवंत वारसा. म्हणूनच आम्ही हा फेस्टिव्हल आयोजित केला,” स्निग्धा मनचंदा (डायरेक्टर, HFG) यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, “आज दाखवलेल्या चित्रपटांतून आम्ही पर्यावरण, आपलेपणा आणि उपजीविकेवर भर दिला आहे. चित्रपट आपल्याला वेगळ्या दिशेने विचार करायला प्रवृत्त करतात. आणि हे चित्रपट आठवण करून देतात की वारसा हा केवळ भूतकाळातला नाही; तो आपण सातत्याने वर्तमानकाळात  निर्माण करत आहोत.”

या फेस्टिव्हलमध्ये चित्रपट दिग्दर्शकांशी संवाद, पॅनेल चर्चासत्रे झाली ज्यात वारसा आणि शाश्वतता हे एकमेकांपासून वेगळे नाहीत हे अधोरेखित झाले.

टिटीएजीचे अध्यक्ष जॅक अजित सुखिजा म्हणाले,  “महिनाभर चाललेल्या ह्या  वर्ल्ड टुरिझम डे सेलिब्रेशनचा समारोप या फेस्टिव्हलमधून झाला. यातून स्थानिक गोष्टी चित्रपटांतून दाखवण्याचा प्रयत्न झाला. ही संपूर्ण यात्रा आमच्यासाठी खूप छान अनुभव होता. यावेळी आम्ही खरंच स्थानिक गोष्टींना महत्त्व दिलं आहे. आणि आता गोवा शाश्वततेच्या प्रवासाला सुरुवात करेल, अशी आशा आहे.”

Trending

Exit mobile version