गोवा खबर

भारताच्या अभियांत्रिकी क्षमतेचा साक्षीदार – झुआरी पूल

Published

on

Spread the love

~  झुआरी पूलाचा 360 मीटर लांबीचा मध्यभाग कोणत्याही खांबाशिवाय उभारलेला असून ही भारतातील दुर्मिळ कामगिरी दर्शवते.
~ पुलाच्या सुरक्षिततेसाठी 32 ट्रक (एकूण वजन 1000 टनांहून अधिक) ठेवून झाली चाचणी.

गोवा खबर: “गोव्याच्या नव्या झुआरी पुलात फक्त लोखंड आणि केबल्स नाहीत, त्यात जादू आणि आकर्षण आहे,” असं या पुलाच्या बांधकामाचे माजी प्रमुख अभियंता उत्पल चक्रवर्ती यांनी सांगितलं. ते म्युझियम ऑफ गोवा, पिलर्ण येथे ‘मोग संडे’ व्याख्यानात बोलत होते.

चक्रवर्ती यांनी सांगितलं की झुआरी पूल फक्त उत्तर आणि दक्षिण गोव्याला जोडणारा पूल नाही, तर आधुनिक भारतीय अभियांत्रिकीची महत्त्वाकांक्षा दाखवणारा एक अभिमानाचा टप्पा आहे. “जेव्हा तुम्ही असा एखादा पूल बांधता, तेव्हा लोकांच्या आकांक्षा वाढतात. आणखी मोठं, आणखी चांगलं काही करण्याची प्रेरणा मिळते,” असं ते म्हणाले.

पुलाच्या बांधकामाच्या टप्प्यांची छायाचित्रं दाखवत त्यांनी सांगितलं की संपूर्ण 360 मीटर लांबीचा मध्यभाग कोणत्याही खांबाशिवाय उभारला गेला. प्रत्येक भाग जोडल्यानंतर ताण-तणाव तपासून मग पुढचा भाग जोडला गेला. “प्रत्येक वेळेस संतुलन परत तपासावं लागलं, कारण एका बाजूचा ताण दुसऱ्यावर परिणाम करत असे,” त्यांनी स्पष्ट केलं.

पुलाच्या सुरक्षिततेसाठी काटेकोर पावलं उचलली गेली. एकूण 106 सेगमेंट्स (प्रत्येक 100 टन वजनाचे) हायड्रॉलिक जॅकने नीट जोडले गेले. केबल्सची चाचणी चीन आणि अमेरिकेत झाली, कारण भारतात अशा मोठ्या प्रमाणावर चाचणीची सुविधा उपलब्ध नाही. “केबल्स 95% क्षमतेपर्यंत तपासल्या जातात, पण प्रत्यक्ष वापरात फक्त 45% क्षमतेचा वापर होतो. त्यामुळे एका केबलमधे बिघाड झाला तर तीचा ताण दुसऱ्या केबल वर जातो,” असं त्यांनी सांगितलं.

सीएसआयआर-एसईआरसी, चेन्नई येथे झालेल्या विन्ड टनल प्रयोगां बद्दल बोलताना चक्रवर्ती यांनी सांगितले की सुरुवातीच्या डिझाइनमध्ये बदल करावे लागले. कारण काँक्रीटच्या भक्कम बॅरिअर्समुळे वाऱ्याचा दाब अडकून राहत असल्याचं चाचणीत आढळून आलं. “म्हणून आम्ही काँक्रीटऐवजी स्टीलचे बॅरिअर्स बसवले, ज्यामुळे वाऱ्याला मोकळा मार्ग मिळेल. कधी कधी डिझाइनलाही भौतिकशास्त्रासमोर नतमस्तक व्हावं लागतं,” असे ते हसत म्हणाले.

पुलाची अंतिम चाचणी 32 ट्रकांच्या थरारक ‘लाईव्ह लोड टेस्ट’ने झाली. शेकडो टन वजन वाहून नेणारे हे ट्रक पुलावर उभे केल्यावर अभियंत्यांनी पाहिले की पूल किती वाकतो आणि पुन्हा किती अचूकपणे आपल्या मूळ स्थितीत परततो.

तांत्रिक कौशल्यापलीकडे, हा पूल गोव्याची अर्थव्यवस्था आणि पर्यटनाचे रूप पालटेल, अशी अपेक्षा आहे. स्थानिक गावांशी अधिक चांगली जोडणी आणि प्रेक्षणीय टॉवर उभारण्याच्या योजनेमुळे, या पुलामुळे पायाभूत सोयी वाढतील, पर्यटकांची संख्या वाढेल आणि स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल.

“सध्या हा फक्त पूल आहे. पण एकदा टॉवर आला की हा आणखी मोठा लँडमार्क बनेल,” असे चक्रवर्ती म्हणाले. आयफेल टॉवरवरून प्रेरित प्रेक्षणीय टॉवर, व्ह्यूइंग गॅलरी, फिरता रेस्टॉरंट आणि आर्ट स्पेस या पुलावर उभारण्याची योजना असून, हे गोव्याला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे मांडेल.

पूर्ण झाल्यानंतर झुआरी पूल हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत लांब केबल-स्टे पूल ठरला आहे. तो दूरदृष्टी, अभियांत्रिकी कौशल्य आणि जिद्दीचं प्रतीक मानला जातो. पूल बांधकामाचं संपूर्ण छायाचित्रण करणारे चक्रवर्ती म्हणाले, “हा प्रकल्प माझ्यासाठी डोळे उघडणारा अनुभव ठरला. मोठ्या संरचनांविषयीची समज वाढली आणि जागतिक दर्जा गाठण्यासाठी आपले प्रयत्न किती मोठे असायला हवेत हे लक्षात आलं. हा फक्त पूल नाही, तर गोव्याचा लँडमार्क आणि भारताच्या पायाभूत प्रवासातील एक मैल्यवान गोष्ट आहे.”

Trending

Exit mobile version