गोवा खबर

गोवा पर्यटन विकास महामंडळाकडून अध्यक्ष गणेश गावकर यांचा गौरव

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसी) अध्यक्ष गणेश गावकर यांचा गौरव करून त्यांच्या कार्यकाळाचा सन्मानपूर्वक निरोप दिला. या प्रसंगी गौरवोद्गार, कृतज्ञता आणि त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाच्या आठवणींनी कार्यक्रम रंगला. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी उपस्थित राहून गावकर यांना गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात विविधता आणून ते अधिक बळकट करण्याच्या त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी सन्मानित केले. गावकर यांच्या पत्नी सदिच्छा गावकर ह्याही कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि त्यांच्या पाठिंब्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.

या निरोप सोहळ्याला पर्यटन संचालक केदार नाईक, जीटीडीसी चे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर, जीटीडीसीचे संपूर्ण सहकारी, जनरल मॅनेजर्स, डेप्युटी जनरल मॅनेजर्स आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून गावकार यांच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली आणि शुभेच्छा दिल्या.

या वेळी बोलताना पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले, गावकर यांनी जीटीडीसीला केवळ ज्ञान आणि समर्पणाने दिशा दिली नाही, तर त्यांनी नम्रतेने आणि माणुसकीने नेतृत्व कसे करावे हेही दाखवून दिले. त्यांचा कार्यकाळ फक्त धोरणे किंवा प्रकल्पांबद्दल नव्हता, तर तो लोकांबद्दल होता. कर्मचारी वर्गाशी जोडले जाण्याची, त्यांचे ऐकण्याची आणि त्यांना प्रेरित करण्याची त्यांची क्षमता संस्थेत विश्वास आणि आदराची परंपरा निर्माण करून गेली आहे. त्यांच्या सेवेसाठी आणि गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात त्यांनी आणलेल्या सकारात्मक बदलासाठी आम्ही सदैव ऋणी राहू.

पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले, अध्यक्ष म्हणून गावकर पर्यटन विभागाच्या दृष्टीकोनाशी खूपच सहकार्यशील होते आणि महत्त्वाच्या उपक्रमांना पुढे नेण्यासाठी त्यांनी हातात हात घालून काम केले. लोकांना एकत्र आणण्याची त्यांची वृत्ती व उत्साह ही त्यांची मोठी ताकद म्हणून लक्षात राहील.

व्यवस्थापकीय संचालक, जीटीडीसी, कुलदीप आरोलकर यांनी सांगितले, गावकर यांची ओपन-डोअर पॉलिसी आणि संस्थेत त्यांनी निर्माण केलेले चांगले वातावरण सर्वांच्या लक्षात राहील. त्यांचे दार नेहमी कर्मचाऱ्यांसाठी खुले असायचे. प्रत्येकाच्या समस्या ते संयमाने ऐकत आणि प्रत्येकाला सन्मान देत. त्यांचा साधेपणा आणि आपुलकी आमच्यावर कायमचा ठसा उमटवून गेला आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीटीडीसी चे डेप्युटी जनरल मॅनेजर (मार्केटिंग) दीपक नार्वेकर यांनी केले. संध्याकाळी कार्यक्रमाचा समारोप होताना जीटीडीसी परिवारातील सर्व सदस्यांनी आणि गावकर यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ संपला असला तरी त्यांची मूल्ये, दृष्टीकोन आणि सर्वसमावेशकतेची भावना जीटीडीसी ला पुढील काळात मार्गदर्शन करत राहील.

Trending

Exit mobile version