गोवा खबर : आपण आपला वारसा विसरलात, तर बाहेरून आलेली संस्कृती तुमची मूळ ओळख पुसून टाकेल. म्हणूनच वारसा म्हणजे काय, हे आधी समजून घेतलं पाहिजे, असं वारसा प्रवर्तक आणि सांस्कृतिक कथाकथनकार संजीव सरदेसाई यांनी क्लुब टेनिस दे गॅस्पर डायस आयोजित शताब्दी व्याख्यान मालिकेत वक्तव्य केलं.
‘अननोन गोवा, अननोन गोंयकार’ या विषयावर बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की वारसा म्हणजे फक्त धार्मिक रचना किंवा दगडी स्मारक नाही, तर स्वयंपाक करण्याच्या पद्धती, शेतीचे तंत्र आणि दैनंदिन जीवनशैलीसह आपल्या परंपरा व संस्कृती देखील त्याचा भाग आहेत. या मुळांकडे दुर्लक्ष केल्यास आपली ओळख नष्ट होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
आपला मुद्दा पटवून देताना त्यांनी गोव्यातील सांस्कृतिक विसंगतीची ठळक उदाहरणं मांडली. सांतिनेज स्मशानभूमीजवळ असलेल्या ऐतिहासिक महत्त्वाच्या कोरलेल्या दगडाकडे आजही दुर्लक्ष होत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच दरवर्षी लाखो पर्यटक गोव्याला भेट देतात, पण त्यांना गोव्याच्या इतिहासाची खरी माहिती देणारी पुस्तिका किंवा प्रामाणिक मार्गदर्शन कमी असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.
गोव्याच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे सांगताना त्यांनी १५१० सालचा दाखला दिला, जेव्हा पोर्तुगीज लोक समुद्रात जवळजवळ बुडाले होते. त्यावेळी तालीगांवच्या शेतकऱ्यांनी भाताचे पोती देऊन त्यांना वाचवलं. त्यातून सुरू झालेली परंपरा आजही पिकांच्या हंगामात सुरू आहे. “२१ऑगस्टला जेव्हा शेतकरी पिकं कापतात, तेव्हा ते पहिले भात सेंट मायकल चर्च, से कॅथड्रल, गोव्याचे आर्चबिशप आणि राज्यपाल यांना अर्पण करतात,” असं सरदेसाई यांनी सांगितलं.
नैसर्गिक वारशाचा उल्लेख करताना त्यांनी गोव्याचा राज्यपक्षी फ्लेम-थ्रोटेड बुलबुल आणि राज्यवृक्ष टर्मिनालिया एलिप्टिका (क्रोकोडाइल बार्क ट्री) यांचा दाखला दिला. “जर तुम्ही घाटात अडकलात आणि पाण्याची कमतरता भासली, तर या झाडाच्या खोडाला क्षिद्र पाडलं तर आत पाणी मिळतं. अगदी बाओबाब झाडासारखं, जे हजारो वर्षं जगतं आणि संपूर्ण जमातींना पाणी पुरवतं,” असं ते म्हणाले.
तसेच त्यांनी गोव्यातील प्रसिद्ध स्मारकांविषयीही अनेक रंजक माहिती दिली. पणजीतील इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चविषयी सांगताना त्यांनी या चर्चच्या वास्तूमध्ये वर्षानुवर्षे झालेल्या बदलांचा उल्लेख केला. “इथला मोठी घंटा मूळात सेंट ऑगस्टिनच्या कॉन्व्हेंटमध्ये होता. २,२५० किलो वजनाची ही घंटा गोव्यातील दुसऱ्या क्रमांकाची जड घंटा आहे. १९३४ मध्ये तिचा मुख्य दर्शनी भाग कोसळल्यानंतर ही घंटा आग्वाद किल्ल्यात नेली आणि जहाजांना इशारा देण्यासाठी तिचा वापर होउ लागला. नंतर दीपगृह आधुनिक झाल्यावर तो पणजीला आणून चर्चच्या मनोऱ्यावर बसवली,” अशी माहिती त्यांनी दिली.
“आपली मुळं मजबूत नसतील, तर तुम्हाला ना चांगलं झाड मिळणार, ना चांगली फळं. वारसा म्हणजे आपल्याच आयुष्याचा भाग आहे, हे समजून घेतलं पाहिजे. ठोस स्मारक असो किंवा परंपरा, दोन्हींचं रक्षण तेवढ्याच उत्कटतेने करा,” असं आवाहन सरदेसाई यांनी व्याख्यानाच्या शेवटी गोमंतकीयांना केलं.