गोवा खबर

काकुलो मॉलमध्ये आंतरराष्ट्रीय डेफ सप्ताह आणि आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनाचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर : समावेशकता आणि सक्षमीकरणाछ्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पणजी शहरातील काकुलो मॉलमध्ये आंतरराष्ट्रीय डेफ सप्ताह आणि आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन उद्योजिका आणि आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा २०२५ च्या पर्पल राजदूत सादिया बांदोडकर यांच्या उपस्थितीत झाले. या तीन दिवसीय उपक्रमामध्ये आयोजित पॉप-अप मार्केटमध्ये विविध दिव्यांग व्यक्तींनी आपल्या उत्पादनांची दालने मांडली होती.

गोवा राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग, राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय, गोवा असोसिएशन ऑफ दि डीफ, आणि सादिया बांदोडकर यांनी संयुक्तपणे हा उपक्रम आयोजित केला होता. ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा २०२५च्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणूनही या उपक्रमाचे आयोजनामागची भूमिका होती.

पहिल्या दिवसाची सुरुवात संवाद सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या आकर्षक भारतीय सांकेतिक भाषा जागरूकता सत्राने झाली. संध्याकाळचे आकर्षण म्हणजे कर्णबधिर महिलांच्या गटाने सादर केलेले नवरात्रीच्या संकल्पनेवरील नृत्य सादरीकरण. या नृत्य सादरीकरणाने प्रेक्षक चांगलेच मंत्रमुग्ध झाल्याबाबतचे प्रतिबिंब सलगपणे चाललेल्या टाळ्यांच्या कडकडाटातून उमटले.

उद्घाटन समारंभाला राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर; दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या संचालक वर्षा नाईक; आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा २०२५ च्या पर्पल राजदूत सादिया बांदोडकर; काकुलो मॉलचे ऑपरेशन्स प्रमुख मंगेश दळवी; गोवा असोसिएशन ऑफ द डेफचे सरचिटणीस प्रसाद जोशी आणि गोवा डिसॅबिलिटी राइट्स असोसिएशन (DRAG) चे अध्यक्ष एवेलिनो डिसा यांच्यासह मान्यवर पाहुण्यांनी उपस्थिती लावली.

याप्रसंगी बोलताना, राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि दिव्यांग व्यक्तींना सक्षम करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी पुढे अधोरेखित केले की हे प्रयत्न या सप्ताहभर चालणाऱ्या उपक्रमाच्या पलीकडे जाऊन समावेशनाच्या निरंतर चळवळीत विकसित झाले पाहिजेत.

कृतज्ञता व्यक्त करताना, पर्पल राजदूत सादिया बांदोडकर यांनी पर्पल फेस्टचे आयोजन विभाग, काकुलो मॉल आणि सर्व समर्थकांचे त्यांच्या प्रोत्साहनाबद्दल आणि सक्षमीकरणासाठी अर्थपूर्ण संधी निर्माण केल्याबद्दल आभार मानले.

तीन दिवसांचा हा उत्सव पॉप-अप मार्केटसह सुरू राहणार आहे. दिव्यांग व्यक्तींना त्यांची सर्जनशीलता, उत्पादने आणि उद्योजकीय कौशल्ये प्रदर्शित करण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

Trending

Exit mobile version