चिंपेल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शिबिरात 60 हून अधिक लाभार्थ्यांना मिळाला आरोग्य सेवांचा लाभ
गोवा खबर:’स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत गोवा राज्यात आयोजित मोफत आरोग्य शिबिरांना महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, त्या या संधीचा पुरेपूर लाभ घेत आहेत.
चिंबेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आज, 20 सप्टेंबर रोजी कुरका येथील शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात सुमारे 70 महिला आणि मुलांनी विविध मोफत सेवांचा लाभ घेतला. या शिबिराला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सेंट आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी शिबिराला भेट दिल्यावर सांगितले. ज्या परिसरात शिबिरे भरवली जात आहेत तिथल्या सर्व रहिवाशांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
“या शिबिरांमध्ये कर्करोग, मधुमेह आणि इतर काही आजारांचे पूर्वनिदान करण्याच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून, महिलांनी आपल्या आरोग्यासाठी त्याचा लाभ घ्यावा. रोगाने गंभीर रूप घेण्याची वाट पाहता कामा नये, अन्यथा त्याची हाताळणी कठीण होईल. डॉक्टर आपल्याला उपचारांबद्दल मार्गदर्शन करतील आणि मोफत औषधे देखील देतील. त्यामुळे आसपासच्या परिसरातील सर्व नागरिकांनी या आरोग्य शिबिरांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे,” ते म्हणाले.
चिम्बेलच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि प्रभारी डॉ. जूड डिसूझा यांनी सांगितले की, शिबिराला भेट देणाऱ्या नागरिकांना पीएमजेएवाय आणि आभा ओळखपत्रांसाठी नावनोंदणी, सामान्य तपासणी, बीपी तपासणी, एचबी चाचणी, मधुमेह तपासणी, स्तनाचा कर्करोग तपासणी, पॅप स्मीयर चाचणी, थुंकी संकलन, छातीचा एक्स-रे आणि डोळ्यांची तपासणी यासारख्या विविध आरोग्य सेवा पुरवल्या जात आहेत. “सर्व सेवा विनामूल्य दिल्या जात आहेत, आणि लाभार्थ्यांना शिबिरातून सामान्य औषधेही मिळत आहेत,” ते म्हणाले.
या मोहिमेची प्रशंसा करताना डॉ विजया नाईक, वैद्यकीय अधिकारी आणि ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियान, पीएचसी चिंबेल च्या नोडल अधिकारी म्हणाल्या की, या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे, ती महिलांवर विशेष लक्ष केंद्रित करते. “कुटुंबातील महिला निरोगी राहणे महत्वाचे आहे. तरच आपण एक निरोगी कुटुंब निर्माण करू शकतो. ही मोहीम महिला आणि मुलांवर लक्ष केंद्रित करीत आहे, ही वस्तुस्थिती कौतुकास्पद आहे,” त्या म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर रोजी सुरू केलेले ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’, ही देशातील महिला आणि मुलांसाठीची आतापर्यंतची सर्वात मोठी आरोग्य मोहीम आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच महिला आणि बालविकास मंत्रालय यांच्या सहयोगाने राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमात, देशभरातील आयुष्मान आरोग्य मंदिरे, सामुदायिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये आणि इतर सरकारी आरोग्य सुविधांमध्ये 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत 10 लाखांहून अधिक आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जात असून, वस्ती पातळीवर महिला-केंद्रित प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सेवा प्रदान करणे, हे याचे उद्दिष्ट आहे.
गोव्यामध्ये, प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने आरोग्य केंद्रे आणि इतर संबंधित विभागांद्वारे सर्व गावांमध्ये शिबिरे आयोजित केली जात आहेत.