गोवा खबर

गोव्यात होणाऱ्या आशियाई ध्रुवीय विज्ञान मंचाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्षस्थान भारत भूषवणार

Published

on

Spread the love

आशियाई ध्रुवीय विज्ञान सहकार्य प्रदर्शनाचे होणार आयोजन

 

भारताने 19 ते 20 सप्टेंबर 2025 रोजी गोव्यामध्ये आशियाई ध्रुवीय विज्ञान मंचाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे यशस्वीरित्या आयोजन केले. ही बैठक भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या राष्ट्रीय ध्रुवीय आणि समुद्र संशोधन केंद्राद्वारे आयोजित करण्यात आली होती.

 

2004 मध्ये स्थापन झालेला आशियाई ध्रुवीय विज्ञान मंच हा आशियाई देशांमध्ये ध्रुवीय संशोधनाला प्रोत्साहन देणारा एक आंतरसंस्थात्मक, अशासकीय मंच आहे. हा मंच चीन, जपान, दक्षिण कोरिया, भारत, मलेशिया आणि थायलंडमधील प्रमुख ध्रुवीय संशोधन संस्थांना एकत्र आणतो, हिमनदी विज्ञान, समुद्रशास्त्र, पृथ्वी आणि ग्रह विज्ञान, तसेच जीवन विज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहयोगी संशोधन विकसित करतो, तर लॉजिस्टिक्स, डेटा शेअरिंग आणि क्षमता निर्मिती यांचा समन्वय साधतो. त्याची मुख्य निर्णय घेणारी संस्था, वार्षिक सर्वसाधारण सभा, कार्य गट आणि कृती गट यांच्या कार्यांचा आढावा घेते, संशोधन प्रस्तावांना मंजुरी देते आणि जागतिक ध्रुवीय विज्ञान आणि हवामान संशोधनामध्ये आशियाचे योगदान बळकट करते.

या वार्षिक सर्वसाधारण सभेत सदस्य देशांचे प्रतिनिधी आणि सायंटिफिक कमिटी ऑन अंटार्क्टिक रिसर्च अर्थात स्कारचे अध्यक्ष प्रा. गॅरी विल्सन यांचे विशेष उद्घाटनपर भाषण झाले. त्यांनी स्कारच्या कार्यक्रमाविषयी माहिती दिली आणि आशियाई ध्रुवीय विज्ञान मंचाच्या तज्ञांना हवामान बदलासंदर्भात विज्ञान प्राधान्यांवर ‘होरायझन स्कॅन’ मध्ये योगदान देण्यासाठी आमंत्रित केले. दोन दिवसांच्या कालावधीत, मंचाने सहयोगी संशोधन प्रकल्प, कार्य गट उपक्रम आणि ध्रुवीय प्रदेशांमधील लॉजिस्टिक्स सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रतिनिधींनी पृथ्वी विज्ञान, महासागर विज्ञान, हिमनदी विज्ञान, ग्रह विज्ञान आणि जीवन विज्ञान यांमधील नवीन प्रस्तावांवर विचारमंथन केले, ज्याचा उद्देश जागतिक ध्रुवीय संशोधनामध्ये आशियाचे सामूहिक योगदान मजबूत करणे हा आहे.

2012 मध्ये नवी दिल्लीत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर, भारताने आयोजित केलेली ही दुसरी बैठक होती. राष्ट्रीय ध्रुवीय आणि समुद्र संशोधन केंद्राचे संचालक डॉ. थंबान मेलोथ यांच्या अध्यक्षतेखाली भारत सध्या आशियाई ध्रुवीय विज्ञान मंचाचे अध्यक्षस्थान भूषवत आहे आणि ते 2026 पर्यंत या पदावर राहतील. सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले, “आशियाई देश आता संशोधन केंद्रे आणि आइस-क्लास जहाजे यासह ध्रुवीय पायाभूत सुविधांमध्ये सर्वाधिक योगदान देणारा गट बनले आहेत. आशियाई ध्रुवीय विज्ञान मंचाचा उद्देश या फायद्याचा लाभ घेऊन 5 व्या आंतरराष्ट्रीय ध्रुवीय वर्षासाठी योगदान म्हणून अंटार्क्टिका आणि आर्क्टिकमध्ये अत्याधुनिक सहयोगी प्रकल्प हाती घेणे आहे. असे डॉ. मेलोथ यांनी यावेळी सांगितले. भारताच्या नेतृत्वाची भूमिका आणखी स्पष्ट करताना ते म्हणाले की, भारताने वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करणे, जागतिक हवामान आणि महासागर प्रणालींसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ध्रुवीय प्रदेशांना समजून घेण्यासाठी आशियाई सहकार्याला प्रोत्साहन देण्याची आपली प्रतिबद्धता अधोरेखित करते.

सत्र 1 –  राष्ट्रीय अहवाल यांद्वारे राष्ट्रीय ध्रुवीय कार्यक्रमांचे व्यापक अवलोकन सादर करण्यात आले. चीनच्या CHINARE या कार्यक्रमाच्या सादरीकरणांमध्ये (वांग जिन्हुई) वैज्ञानिक मोहिमा, स्टेशन ऑपरेशन्स आणि अंटार्क्टिक संशोधन कामगिरीचे तपशीलवार वर्णन करण्यात आले; भारताचे ध्रुवीय कार्यक्रम (राहुल मोहन), ज्यामध्ये अंटार्क्टिक आणि आर्क्टिक उपक्रम, लॉजिस्टिक्स, स्टेशन व्यवस्थापन आणि दक्षिण महासागर संशोधन यांचा समावेश होता; जपानच्या एनआयपीआर उपक्रमात (योशिफुमी नोगी) अंटार्क्टिक संशोधन, पायाभूत सुविधा आणि दीर्घकालीन निरीक्षणे अधोरेखित केली गेली; KOPRI अपडेट्स (जिहून जेओंग) यामध्ये आर्क्टिक आणि अंटार्क्टिक संशोधनाचे ठळक मुद्दे, फेलोशिप कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यांचा समावेश आहे; मलेशिया आणि थायलंडमधील अपडेट्स, मोहीम नियोजन, ऑपरेशनल लॉजिस्टिक्स आणि चालू वैज्ञानिक अभ्यासांचा तपशील समाविष्ट करण्यात आले. या अहवालांमध्ये एकत्रितपणे, आशियाच्या सध्याच्या ध्रुवीय संशोधन क्षमता, वैज्ञानिक प्राधान्ये आणि ऑपरेशनल आव्हानांचा समग्र दृष्टिकोन मांडण्यात आला.

सत्र 2: IPY5 – सहयोगी स्तरावरील प्रयत्नांसाठी AFoPS रोडमॅप बहुपक्षीय सहकार्य वृध्दिंगत करण्यावर आणि भविष्यातील संशोधन दिशानिर्देशांना आकार देण्यावर केंद्रित असा होता. चीनने, Lei Ruibo च्या माध्यमातून, 5 वे आंतरराष्ट्रीय ध्रुवीय वर्ष (IPY5) यामध्ये संभाव्य योगदानाची रूपरेषा आखली, नवीन संशोधन संकल्पना आणि सहयोगी संधींवर भर दिला. मेंग झू यांच्या अंटार्क्टिक शरद ऋतू-हिवाळी परिसंस्थेवरील सादरीकरणांमधून प्रादेशिक जैवविविधता आणि बहु-देशीय संशोधनाचे मार्ग एक्सप्लोर केले गेले.

युसुके सुगानुमा आणि योशिफुमी नोगी यांनी विशेषतः भारत-जपान यांच्यातील संयुक्त उपक्रम सादर केले, ज्यामध्ये क्षेत्रीय अभ्यास, डेटा शेअरिंग आणि दीर्घकालीन उद्दिष्टांवर प्रकाश टाकण्यात आला. जिनयाँग जुंग आणि खांग ह्युन ली यांच्यासह कोरियन संशोधकांनी आर्क्टिक आणि अंटार्क्टिक संशोधनाचे ठळक मुद्दे, अंतर्देशीय मोहिमा आणि सशक्त आंतरराष्ट्रीय सहयोग यावर सविस्तर चर्चा केली.

या वार्षिक सर्वसाधारण बैठकीचा मुख्य भर ध्रुवीय पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स आणि ऑपरेशनल सहयोगावर होता. चीनच्या जी ली यांनी स्टेशन व्यवस्थापन आणि लॉजिस्टिकल सपोर्टवरील अद्ययावत माहिती सादर केली. भारताचे प्रतिनिधी शैलेंद्र सैनी, मनीष तिवारी आणि साबू पी यांनी भारताच्या अंटार्क्टिक आणि आर्क्टिक कार्यक्रम, दक्षिण महासागर संशोधन आणि मोहीम नियोजन यावर व्यापक स्तरावर अपडेट्स दिले. जपानच्या सातोशी इमुरा यांनी राष्ट्रीय ध्रुवीय पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्सवर प्रकाश टाकला, तर मलेशियाचे प्रतिनिधी, वान मोहम्मद रौहान वान हुसेन आणि तमालिया अमांडा पुत्री ओथमन यांनी मोहीम धोरणे आणि ऑपरेशनल योजनांची रूपरेषा मांडली. या सादरीकरणांनी आशियातील प्रभावी ध्रुवीय संशोधनासाठी समन्वित लॉजिस्टिक्स आणि पायाभूत सुविधा विकासाचे महत्त्व अधोरेखित केले.

या बैठकीचा समारोप AFoPS बिझनेस मीटिंगने झाला. यात धोरणात्मक नियोजन, नवीन प्रकल्पांना मान्यता, कार्य आणि कृती गट क्रियाकलापांमधील समन्वय आणि भविष्यातील सहयोगाच्या फ्रेमवर्कवर चर्चा करण्यात आली. या चर्चेमुळे आशिया-केंद्रित ध्रुवीय संशोधनासाठी प्रमुख व्यासपीठ म्हणून AFoPS ची भूमिका अधिक ढळक झाली. त्याचप्रमाणे, सदस्य देशांना संसाधने एकत्रित करण्यास, कौशल्ये शेअर करण्यास आणि जागतिक स्तरावर त्यांचा सामूहिक वैज्ञानिक प्रभाव मजबूत करण्यास बळ मिळाले.

एकंदरीत, AFoPS AGM 2025 मुळे ज्ञानाचे आदानप्रदान, धोरणात्मक नियोजन आणि ऑपरेशनल समन्वयासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध झाले. आशियामध्ये ध्रुवीय संशोधनाला चालना देण्यासाठी वैज्ञानिक सहयोग, क्षमता बांधणी आणि लॉजिस्टिकल सिनर्जीचे महत्त्व अधोरेखित करण्यात याची मदत झाली. या बैठकीत समन्वित, बहुराष्ट्रीय उपक्रमांद्वारे जागतिक ध्रुवीय विज्ञान, हवामानाचा अभ्यास आणि ध्रुवीय परिसंस्थांच्या शाश्वत व्यवस्थापनात योगदान देण्याप्रति सदस्य राष्ट्रांच्या वचनबद्धतेची खात्री मिळाली.

Trending

Exit mobile version