गोवा खबर : राज्यातील युवकांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढील दोन वर्षांत आणखी ५ हजार नोकऱ्या दिल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.
भाजपच्या “सेवा पंधरवडा” उपक्रमांतर्गत पणजी येथील कला अकादमीत आयोजित रोजगार मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी विविध सरकारी खात्यांमध्ये ९७० पदांवर नियुक्तिपत्रेही प्रदान करण्यात आली.
मुख्यमंत्री म्हणाले, प्राथमिक शिक्षकांच्या ४७५ जागा भरलेल्या असून पुढील सहा महिन्यांत या जागा कायमस्वरूपी पद्धतीने भरल्या जातील. युवकांनी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी केली पाहिजे. UPSC, GPSC, बँक, रेल्वे अशा परीक्षांमध्ये गोव्यातील विद्यार्थी चमकावेत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे म्हणून अप्रेंटिसशिप व इंटर्नशिप सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून दहा ते पंधरा हजार रुपये स्टायपेंड देऊन युवक-युवतींना कामाचा अनुभव दिला जात आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून ५० हजार महिलांना जोडण्यात आले असून गेल्या दहा वर्षांत या महिलांनी ३४० कोटींची उलाढाल केली आहे. रोजगार व स्वावलंबनाच्या संधी सातत्याने निर्माण होतील यासाठी सरकार कटिबद्ध आहे.