गोवा खबर : कुंभारजुवे मतदारसंघात विकासकामे प्रभावीपणे राबवण्यासाठी आमदार राजेश फळदेसाई यांना राज्य सरकार आणि भाजपकडून पूर्ण पाठिंबा मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
आमदार फळदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री व खासदार श्रीपाद नाईक, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, परिवहन मंत्री माविन गुदिन्हो, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तनावडे, विविध आमदार, माजी आमदार, मान्यवर व मोठ्या संख्येने शुभेच्छुक उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, फळदेसाई हे मतदारांसाठी २४ तास काम करतात. त्यामुळे त्यांना सरकार व पक्षाचा नेहमीच पाठिंबा मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत २०४७ ही दृष्टी ठेवली आहे. त्याच धर्तीवर ‘विकसित गोवा २०४७’चे उद्दिष्ट साकार करण्यासाठी दुहेरी इंजिन सरकारला साथ द्या.
फळदेसाई यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मतदारसंघात अनेक विकासकामे यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून मुख्यमंत्री सावंत यांनी धावजी येथे ४० कोटींचा उड्डाणपूल मंजूर केला आहे, जो पुढील वर्षी जानेवारीत तयार होईल.
पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी म्हटले की, फळदेसाई दृढनिश्चयी आहेत. कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत म्हणून ते सदैव प्रयत्नशील असतात. मानवी विकासावर लक्ष केंद्रित करून ते लोकांपर्यंत सरकारी योजना पोहोचवत आहेत.
परिवहन मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले की, कुंभारजुवे मतदारांनी चांगला माणूस आमदार म्हणून निवडून दिला आहे. फळदेसाईंची स्वच्छ प्रतिमा, मदतीची तयारी आणि तत्परता हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. आजच्या काळात असे लोक दुर्मिळ आहेत.”