गोवा खबर : भारत सरकारच्या सेवा पखवाडा अभियानाअंतर्गत, गोवा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण समिती (GSCERT), राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सक्षमीकरण संस्था (NIEPID)-सिकंदराबाद आणि राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय यांच्या वतीने १७ ते २४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत बौद्धिक दिव्यांग (पूर्वी मतिमंद असे संबोधले जात असे) मुलांसाठी NIEPID DISHA अभ्यासक्रम लागू करण्यासाठी गोवा राज्यातील विशेष शाळा आणि समावेशक शाळांमधील २४० विशेष शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणाचा उद्घाटन समारंभ NIEPID, GSCERT गोवा आणि NIMHR, सिहोर, मध्य प्रदेश यांच्या सहकार्याने हायब्रिड (ऑनलाइन आणि ऑफलाइन) पद्धतीने आयोजित करण्यात आला.
केंद्रीय समाजकल्याण आणि सक्षमीकरण मंत्रालय तसेच दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून भाषण केले. राज्यात NIEPID DISHA अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल GSCERT आणि राज्य दिव्यांगजन आयुक्त यांनी राबवलेल्या प्रयत्नांचे कौतुक त्यांनी केले.
मुंबईस्थित जय वकील फाउंडेशनच्या सीईओ अर्चना चंद्रा यांनी दिशा अभ्यासक्रमाबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या की, जय वकील फाउंडेशद्वारे विकसित केलेला हा दिशा अभ्यासक्रम बौद्धिक दिव्यांग मुलांसाठी एक प्रमाणित अभ्यासक्रम आहे. २०१९मध्ये NIEPIDद्वारे या अभ्यासक्रमाला मान्यता देण्यात आली असून, महाराष्ट्रातील ४६० विशेष शाळांमध्ये यशस्वीरित्या अंमलात आणला गेला आहे. आता संस्थेने अभ्यासक्रमाच्या देशभर अंमलबजावणीसाठी NIEPID सोबत सामंजस्य करार केला आहे. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांची परिक्षा घेण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला आहे, तसेच शिक्षकांसाठी शिक्षणसंहिता बनवली गेली आहे तसेच विद्यार्थ्यांच्या कार्यपुस्तिकाही विकसित केल्या गेल्या आहेत.
दिशा वेब-पोर्टल शिक्षकांना ऑनलाइन मूल्यांकन करण्यास आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे संनियंत्रण करण्यास सक्षम करते तसेच शाळास्तर, जिल्हास्तर आणि राज्य स्तरावरील रिअल-टाइम डेटाही या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध केला जातो.
राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी गोवा राज्यात NIEPID दिशा अभ्यासक्रमाची प्राधान्याने अंमलबजावणी करण्याबाबत सहमती दर्शविली होती. दिशा अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी विशेष शिक्षण शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी GSCERTच्या संचालिका श्रीमती मेघना शेटगावकर यांनी पाठिंबा दिला.
बौद्धिक दिव्यांग मुलांसाठी प्रमाणित अभ्यासक्रम प्रदान करण्यासाठी यशस्वी ठरलेल्या प्रोजेक्ट दिशाची देशभर अंमलबाजवणी करणे आणि यासाठी विविध राज्यांच्या राज्य सरकारांशी समन्वय साधणे या उद्देशाने NIEPID-सिकंदराबादने जय वकील फाउंडेशनसोबत सामंजस्य करार केला आहे.
नवी दिल्ली येथील भारतीय पुनर्वसन परिषदेद्वारे NIEPID-DISHA अभ्यासक्रमास मान्यता देण्यात आली आहे. गोवा राज्यातील विशेष आणि समावेशक शाळांमधील बौद्धिक दिव्यांग मुलांना या अभ्यासक्रमाचा लाभ मिळणार आहे.