गोवा खबर

पणजीत स्मृति संगीतमहोत्सव : पं. प्रभाकर चारी व पं. योगराज नाईक यांना अभिवादन

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्याच्या संगीत विश्वाला आपले कार्य आणि साधना अर्पण करणारे पं. प्रभाकर चारी आणि सितारवादक पं. योगराज नाईक यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दोन दिवसीय स्मृति संगीतमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पं. प्रभाकर चारी प्रतिष्ठान आणि स्वर संस्कृती म्युझिक अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा संगीतमहोत्सव २० व २१ सप्टेंबर रोजी इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृह, पणजी येथे संध्याकाळी चार वाजता सुरू होणार आहे.

या महोत्सवात देशभरातील नामवंत कलाकार सहभागी होऊन शास्त्रीय संगीतातील विविध पैलू रसिकांसमोर सादर करणार आहेत. पहिल्या दिवशी मंजुश्री माटे यांचा नृत्याविष्कार होणार असून प्रचला आमोणकर या सुरेल गायन सादर करतील. तसेच सदानंद आमोणकर, लक्ष्मीकांत खांडेकर आणि रघुवीर फडते या त्रयीचे सितारवादन होणार आहे. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध सितारवादक पं. रवी चारी यांच्यासोबत सारंग वेचलेकर, मंदार कट्टी, विशाल भुर्के, कविता लोटलीकर आणि खुशी चौगुले हे सितारवादनाची मैफल सजवणार आहेत.

दुसऱ्या दिवशी या कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण ठरणार आहे ते गोवा कॉलेज ऑफ म्युझिकचा ‘लयबंध’ हा तालवाद्यांचा समूह. त्यानंतर पल्लवी पाटील यांचे गायन आणि डॉ. मनीषा कुलकर्णी यांचे सोलो हार्मोनियम वादन होईल.

 याशिवाय ‘तालवंदना’ या विशेष सादरीकरणात पं. तुळशिदास नावेलकर, पं. उल्हास वेलिंगकर, श्रीकुमार सरज्योतिषी, डॉ. साईश देशपांडे, डॉ. राजेश भटकुर्से, अमित भोंसले आणि गीतेश मांद्रेकर सहभागी होणार आहेत. तसेच कृष्णा सालुंके व त्यांचा समूह “पखवाज शिवतांडव” सादर करून रसिकांना वेगळीच अनुभूती देतील. या सादरीकरणात प्रफुल सोनकांबळे (गायन), ज्ञानेश्वर अंदील (पखवाज), गोपाळ पांचाळ (पखवाज), आणि यश मेस्त्री (मंजीरा) यांचा सहभाग असेल.

दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमासाठी साथसंगतकार म्हणून पं. शुभ महाराज, दत्तराज म्हाळशी, गौतमी आमोणकर, सृजन भटकुर्से, वासीम खान आणि श्रीपाद चारी हे उपस्थित राहणार आहेत.

या स्मृति संगीतमहोत्सवाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे पं. प्रभाकर चारी व पं. योगराज नाईक यांच्या सांगितिक परंपरेला अभिवादन करणे आणि नव्या पिढीसमोर शास्त्रीय संगीतातील वैविध्यपूर्ण कलाविष्कार सादर करणे हा आहे. पणजीतील रसिकांसाठी दोन दिवस चालणारा हा संगीतमहोत्सव संगीताच्या दुनियेत एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.

याप्रसंगी पं. प्रभाकर चारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पं. रवी चारी म्हणाले, “पं. प्रभाकर चारी माझे केवळ वडील नव्हते तर एक प्रेरणादायी गुरु होते. त्यांच्या साधनेतून आणि मूल्यांतून आम्हाला नेहमीच संगीताची शिस्त, संवेदनशीलता आणि कलेप्रती निष्ठा शिकायला मिळाली. त्यांनी ७० ते ८० च्या दशकात त्यांनी “स्वरांजली” या कार्यक्रमाच्या मार्फत अनेक ठिकाणी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा प्रचार-प्रसार केला. त्यांच्या हातून अनेक मोठमोठे शिष्य घडले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही या सांगीतिक कार्यक्रमाद्वारे देशविदेशातून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना देखील हे जाणवावे की भारताच्या इतर भागांप्रमाणेच गोव्यातही हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील समृद्ध परंपरा आजही जिवंत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न नेहमीच करतो.”

Trending

Exit mobile version