गोवा खबर : गोवा आज फक्त समुद्रकिनारे, निसर्गसौंदर्य किंवा सण-उत्सवांसाठीच नव्हे, तर भारताची उदयोन्मुख पाककला राजधानी म्हणूनही झपाट्याने प्रसिद्ध होत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय उपाहारगृह संघटना (एनआरएआय) यांनी यंदा आपली वार्षिक शिखर परिषद गोव्यात आयोजित केली होती, विशेष म्हणजे, गोवा या प्रतिष्ठित परिषदेचे पहिल्यांदाच आयोजन करत आहे.
सध्या भारतातील संघटित अन्नसेवा बाजारपेठेत गोवा १२व्या क्रमांकावर आहे आणि त्यामुळे या परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गोव्याचा रेस्टॉरंट व्यवसाय कशा प्रकारे बदलतो आहे, विकसित होतो आहे आणि भविष्यातील संधी काय आहेत, यावर प्रकाश टाकण्यासाठी गोवा खबर ने एनआरएआयच्या गोवा चॅप्टरचे प्रमुख प्रल्हाद सुखटणकर यांची खास मुलाखत घेतली.
विविधतेने नटलेली स्थानिक पाककला, पोर्तुगीज वारसा आणि आजच्या आधुनिक जागतिक रेस्टॉरंट्स यांचा संगम गोव्याला वेगळेपण देतो. भात, नारळ, मीठ यांसारख्या पारंपरिक स्थानिक उत्पादनांपासून ते पोर्तुगीजांनी भारतात आणलेले बटाटे, टोमॅटो, मिरची आणि पाव यांसारख्या नव्या घटकांपर्यंत—या सर्वांचा केंद्रबिंदू गोवा ठरला आहे. त्यामुळे गोवा हा केवळ सांस्कृतिकच नव्हे तर पाककलेचाही प्रवेशद्वार आहे, असे प्रल्हाद म्हणतात.
आज येथे पर्यटकांना एका दिवसात पारंपरिक कॅफेत नाश्ता, थाळी भोजनगृहात दुपारचे जेवण आणि अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय रेस्टॉरंटमध्ये रात्रीचे जेवण अनुभवता येते. स्थानिक लोकांची उदारमतवादी वृत्ती आणि पर्यटकांची खुली दृष्टी यामुळे नवीन प्रयोगांना येथे नेहमीच संधी मिळते. त्यामुळे कोविडनंतर गोव्याची पाककला प्रतिमा अधिक बळकट झाली आहे.
रेस्टॉरंट उद्योगाचा गोव्याच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम जाणवतो. पर्यटनावर होणाऱ्या खर्चापैकी जवळपास ५० टक्के रक्कम अन्न-पेयावर खर्च होते. या क्षेत्रामुळे शेती, मत्स्य व्यवसाय, लॉजिस्टिक्स तसेच डिझाईनसारखे इतर उद्योगदेखील सक्षम होत आहेत. संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन यांनाही या उद्योगाने नवा आयाम दिला आहे.
तथापि, या वाढीसाठी काही महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. परवाना प्रक्रियेतील सुलभीकरण, प्रशिक्षित मनुष्यबळाची तयारी आणि स्थानिक उत्पादनांचे संवर्धन या तीनही क्षेत्रांत सातत्यपूर्ण प्रयत्न होणे गरजेचे आहे. गोव्याची पारंपरिक ओळख जपतच नवे प्रयोग व्हावेत, असे सुखटणकर यांचे मत आहे.
गोव्यात होणाऱ्या या शिखर परिषदेत परवाना प्रक्रियेतील सुधारणा, पर्यटनातील शाश्वतता आणि कौशल्याधारित मनुष्यबळ विकास या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा होणार आहे.
गोव्याच्या पाककला वारशाचे प्रतीक म्हणून ‘गोवन थाळी’ हे योग्य उदाहरण. एका थाळीत अनेक समुदायांचा आणि संस्कृतींचा संगम दिसून येतो, ज्यातून गोव्याचे समावेशक आणि रंगीबेरंगी खाद्यविश्व उलगडते. आज गोवा केवळ भारताच्या पर्यटन नकाशावरच नव्हे, तर पाककलेच्या नकाशावरही आपली स्वतंत्र ओळख ठळकपणे निर्माण करत आहे, असे प्रल्हाद गर्वाने सांगतो.