गोवा खबर : वैश्विक तापमान वाढीच्या संकटावर तोडगा काढायचा असेल तर जंगलांचे संवर्धन आवश्यक आहे. यासाठी वन खात्यांच्या जमिनींचे मृदा संशोधन कार्ड (आरोग्य कार्ड) करणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असे प्रतिपादन वनमंत्री विश्वजीत राणे यांनी वाळपई येथील वन प्रशिक्षण केंद्रातील विशेष कार्यक्रमात केले.
कार्यक्रमात त्यांनी मृदा आरोग्य कार्ड उपक्रमाचे उद्घाटन केले. व्यासपीठावर कमल दत्ता, के. रमेश कुमार, प्रवीण कुमार राघव, एन. पलनीकांत बेंगलोर, अंकित कुमार तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
मृदा परीक्षणामुळे झाडांची जोमदार वाढ
मंत्री राणे म्हणाले, जमिनींचे आरोग्य कार्ड तयार झाल्यानंतर त्या जमिनीत कोणते सूक्ष्म अन्नद्रव्य कमी आहे हे लक्षात येईल. त्यानुसार खत व्यवस्थापन करता येईल. यामुळे झाडांची जोमाने वाढ होईल, योग्य झाडांची लागवड करता येईल, फळे फुले मुबलक येतील आणि वन्यजीवांचे संगोपनही शक्य होईल.
त्यांनी पुढे सांगितले की, मुलांची नियमित तपासणी करून औषधोपचार दिले जातात त्याप्रमाणे माती परीक्षणामुळे झाडांना आवश्यक अन्नद्रव्य पुरवणे शक्य होईल. राज्यात आधीच पाच लाख झाडे लावली आहेत. आता दहा लाख झाडांची लागवड आणि संगोपनावर भर देणार आहोत.
गवत व फळझाडांची लागवड महत्त्वाची
जंगली गवे ग्रामीण भागात शिरून पिकांचे नुकसान करू नयेत यासाठी जंगलात गवत वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आंबा, जांभूळ, पेरू, सीताफळ यांसारख्या झाडांची लागवड करून त्यांची जलद वाढ साधणे गरजेचे आहे. या फळांवर जंगली प्राणी आपला उदरनिर्वाह करतील आणि लोकवस्तीतील त्यांचा वावर कमी होईल, असेही राणे म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश गावडे पिंगुळकर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.