गोवा खबर : माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. भाजपकडून पक्षप्रवेशाचा प्रस्ताव आल्यास नक्कीच विचार करेन आणि योग्य मुहूर्तावर घरवापसी होईल, असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.
पत्रकारांनी विचारले की, आपण भाजपमध्ये परतण्यास इच्छुक आहात का? त्यावर पार्सेकर म्हणाले, काही गोष्टी योग्य वेळ आल्यावरच घडतात. भाजपने प्रस्ताव दिला तर विचार करण्यास हरकत नाही. योग्य वेळी घरवापसी होईल.
मांद्रेतील प्रश्नांवर मौन
मांद्रेतील रस्त्यांची दुर्दशा आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत विचारले असता पार्सेकर यांनी भाष्य करण्यास नकार दिला. सध्याची वस्तुस्थिती प्रसारमाध्यमांतून स्पष्ट दिसते, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पार्सेकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यातील घनिष्ठ संबंध सर्वज्ञात आहेत. दामू नाईक यांनी नेहमीच जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते पुन्हा पक्षात आणण्यावर भर दिला आहे. त्यामुळे पार्सेकर यांची घरवापसी निश्चित मानली जात आहे. जर असे झाले तर २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत मांद्रे मतदारसंघात रंगतदार लढत होणार हे निश्चित आहे.
भाजपसाठी कुटुंबाचा दुरावा सहन केला
पार्सेकर यांनी यापूर्वीही स्पष्ट केले होते की त्यांचा मूळ पिंड भाजपचाच आहे. पक्षासाठी मला १२ वर्षे घर सोडावे लागले होते. माझे कुटुंब महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे समर्थक होते. मी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा कुटुंबातील दुरावा सहन करावा लागला होता. पण पक्षाशी असलेली निष्ठा मी कधी सोडली नाही, असे ते म्हणाले.