गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त उद्या, १७ सप्टेंबरपासून देशभरात ‘सेवा पंधरवडा’ सुरू होत आहे. याअंतर्गत गोव्यातही विविध उपक्रम राबवले जाणार असून २ ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंतीपर्यंत हे कार्यक्रम सुरू राहतील.
पत्रकार परिषदेत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की या काळात आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहीमा, दिव्यांगांसाठी विशेष उपक्रम, तसेच युवक आणि महिलांसाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सेवा पंधरवड्याचा मुख्य उद्देश म्हणजे समाजाभिमुख उपक्रमांद्वारे नागरिकांना थेट लाभ मिळवून देणे, असे नाईक म्हणाले.
पार्सेकरांच्या घरवापसीबाबत भाष्य टाळले
पत्रकारांनी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाविषयी विचारले असता दामू नाईक यांनी याबाबत भाष्य करण्यास टाळले. ते म्हणाले, भाजप हा १४ कोटी सदस्यांचा पक्ष आहे. तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर पक्षाकडे आकर्षित होत आहे. लवकरच युवा मोर्चाचे अधिवेशन होणार असून तेव्हा अनेक युवक पक्षात सहभागी होतील.”
अजित पवारांवर टीका
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “पर्रीकर कोण?” असा प्रश्न उपस्थित केला होता. या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया देताना दामू नाईक म्हणाले, ही त्यांची राजकीय अज्ञानाची पातळी दाखवणारी बाब आहे किंवा त्यांनी जाणूनबुजून अज्ञानाचे ढोंग केले आहे. पर्रीकरांचे योगदान संपूर्ण देशाला माहीत आहे. मुख्यमंत्री म्हणून तसेच केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी केलेली कामगिरी अभूतपूर्व आहे.