गोवा खबर : तिस्क उसगाव येथे आठ हजार चौरस मीटरवर उभा राहणारा नवीन मॉल व मार्केट प्रकल्प यांच्या पायाभरणीचा सोहळा येत्या ऑक्टोबरमधील पहिल्या आठवड्यात पार पडेल, अशी महत्वाची माहिती आज आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी तिस्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गौरव व बक्षीस वितरण समारंभात दिली. ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
राणे म्हणाले, हा प्रकल्प २०२७ पूर्वीच लोकांना समर्पित करण्यात येईल आणि अंदाजे खर्च ५ ते १० कोटी रुपयांच्या दरम्यान असेल. त्यांनी पुढे सांगितले की, हा प्रकल्प उसगावमधील सर्वांत उंच इमारतींपैकी एक असेल व यात सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध असतील — महिला संघटनांसाठी तसेच माध्यमांसाठी वेगळे कक्ष, बॅडमिंटन कोर्ट, भव्य सभागृह आणि व्यापारी आवश्यक सुविधांचा समावेश असेल. प्रकल्पाच्या सुरूवातीच्या टप्प्यात सध्या उसगावात व्यवसाय करणाऱ्यांना पहिल्यांदा प्राधान्याने जागा देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी कृषी मंत्री रवी नाईक, उसगाव जिल्हा पंचायत सदस्य उमाकांत गावडे, उसगाव पंचायतीचे सरपंच संजय (प्रकाश) गावडे, माजी सरपंच रामनाथ डांगी, उपसरपंच संगीता डोईफोडे, तसेच आरोग्य खात्याचे उपसंचालक डॉ. संदेश मडकईकर व मंडळाचे अध्यक्ष समीर फात्रेकर, सचिव अमेय पारकर आदी उपस्थित होते. समारंभाचे सूत्रसंचालन अजयर बागकर यांनी केले तर स्वागत समीर फात्रेकर यांनी केले.
कार्यक्रमात आंतरशालेय फुगडी स्पर्धेतील विजेत्या पथकांचा सन्मानही करण्यात आला; धारबांदोडा व उसगाव पंचायत क्षेत्रातील दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
सरकारकडून सांगण्यात आले की, प्रकल्पामुळे स्थानिक रोजगार निर्मिती होणार, पर्यटनाला चालना मिळेल आणि बाजारपेठेतील सुव्यवस्था वाढीस लागेल. स्थानिक नेते व पदाधिकारी यांचे सत्कारही समारंभात करण्यात आले.