गोवा खबर

गरजवंत नागरिकांच्या घराला आपला पूर्ण पाठिंबा : आर्लेकर

Published

on

Spread the love

गोवा खबर : गरजवंत नागरिकांच्या अडचणींना सरकारकडून तसेच आपल्या स्तरावरूनही पूर्ण पाठिंबा मिळेल, असे आश्वासन पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिले.

कोरगाव येथील धिल्लन वेंगुर्लेकर यांचे घर कोसळल्यानंतर त्यांना समाजातील अनेकांनी मदत केली होती. मात्र या कुटुंबाला पुन्हा घर उभे करण्यासाठी आमदार आर्लेकर यांनी पुढाकार घेत मोठी आर्थिक मदत केली. याशिवाय सरकारमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीतूनही वेंगुर्लेकर कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. हा धनादेश आमदार आर्लेकर यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन सुपूर्द केला.

या कार्यक्रमाला कोरगाव पंचायतीचे पंच लौकिक शेट्ये, देविदास नागवेकर, च्यारी, उमेश तळवणेकर, प्राचार्य सुदन बर्वे, शिक्षक देवानंद कुडव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

यावेळी आमदार आर्लेकर म्हणाले, कोरगाव पंचायत क्षेत्राच्या विकासासाठी सरकारकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळात नियोजनबद्ध विकास साधला जाईल. गरजवंतांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. सरकारही नेहमीच अशा कुटुंबांना मदतीचा हात देत असते.

धिल्लन वेंगुर्लेकर यांनी मनोगत व्यक्त करताना, आमदार आर्लेकर यांनी तातडीने मदत करून आमचे घर पुन्हा उभारण्यासाठी आधार दिला, याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो, असे सांगितले.

प्राचार्य सुदन बर्वे यांनीही मनोगत व्यक्त करताना म्हटले , भर पावसात कोसळलेल्या घराची आमदार आर्लेकर यांनी दखल घेऊन चतुर्थीपूर्वी ते पुन्हा उभारून देण्याचे कार्य केले. त्यांना अशीच गरजवंतांना मदत करण्याची प्रेरणा गणपती बाप्पा आगामी काळात देईल, तसेच त्यांच्या जीवनात सुख-शांती व समृद्धी लाभो, अशी शुभेच्छा दिली.

Trending

Exit mobile version