गोवा खबर : पेडणे तालुक्यातील महिलांना स्वावलंबी करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. या योजना प्रत्येक महिला सेल्फ-हेल्प ग्रुपने आत्मसात करून केवळ राज्यातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपले पदार्थ पोहोचवावेत, असे आवाहन आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केले.
द सप्तर्षी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने पेडणे नगरपालिकेच्या क्षेत्रात भरविण्यात आलेल्या चतुर्थी विशेष बाजाराचे उद्घाटन आमदार आर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले. हा बाजार २१ ते २४ ऑगस्ट दरम्यान सुरू राहणार असून महिला मंडळांनी तयार केलेले खाद्यपदार्थ, कपडे व अन्य वस्तू या ठिकाणी विक्रीस उपलब्ध आहेत.
उद्घाटन प्रसंगी कोरगावचे जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर, मोरजीचे जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर, माजी नगराध्यक्ष शिवराम तुकोजी, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक माधव सीनाई देसाई, मोपा सरपंच सुबोध महाले, स्वाती गवंडी, तारा हडफडकर, स्नेहा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार आर्लेकर म्हणाले, पेडणे तालुक्यातील दोनही आमदार व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. त्यामुळे महिलांनी न घाबरता स्वावलंबी होण्याचा मार्ग स्वीकारावा.
तसेच, नागरिकांनीही या बाजाराला भेट देऊन महिला उद्योजिकांना प्रोत्साहन द्यावे, असा आग्रहही त्यांनी व्यक्त केला.