गोवा खबर : गोव्यातील सर्वात मोठा मान्सून महोत्सव बोंदेराची ४१वी आवृत्ती साजरी करण्यासाठी हजारो लोक जमले, तेव्हा दिवाडीचे नयनरम्य बेट उत्साही रंग, संगीत आणि उत्सवाने जीवंत झाले. गोवा सरकारचे पर्यटन खाते आणि कला व संस्कृती संचालनालयाच्या सहकार्याने पिएदाद युथ असोसिएशनने आयोजित केलेल्या या महोत्सवात, पुन्हा एकदा दिवाडीच्या अद्वितीय सांस्कृतिक परंपरा आणि तरुणाईच्या भावनेचे दर्शन घडले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पर्यटन मंत्री रोहन खंवटे आणि सन्माननीय पाहुणे म्हणून कुंभारजुवेचे आमदार, राजेश फळदेसाई उपस्थित होते. तसेच कुडतरीचे आमदार, अलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, दिवाडीचे पॅरिश प्रीस्ट फादर सिमाओ रॉड्रिग्ज, दिवाडीचे सहाय्यक पॅरिश प्रीस्ट फादर लेस्ली गोम्स, गोल्टि नावेली दिवाडीचे सरपंच मारियो पिंटो, अल्कॉन व्हिक्टर ग्रुपचे संचालक वरुण अल्बुकर्क आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते. दिवाडीच्या लोकांसोबत हा उत्सव साजरा करण्यात ते सामील झाले.
खंवटे म्हणाले, बोंदेरा हा उत्सव गोव्याच्या उत्साही परंपरेचे जिवंत उदाहरण आहे, जो तरुणाईच्या उर्जेने साजरा केला जातो. अशा प्रकारचे उत्सव केवळ आपला वारसा जपत नाहीत तर सामुदायिक बंध देखील मजबूत करतात. तसेच पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांपलीकडील गोव्याचा अनुभव घेण्यासाठी आकर्षित करतात.
पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले, बोंदेरा येथे दिसणारा उत्साह हा समुदाय-नेतृत्वाखालील साजरा होणाऱ्या उत्सवांच्या, खऱ्या भावना प्रतिबिंबित करतो. पर्यटन खाते गोव्याच्या संस्कृतीला उजाळा देणाऱ्या, पुनरुत्पादित पर्यटनाला चालना देणाऱ्या आणि पर्यटकांना स्थानिक परंपरेशी जोडण्याची संधी देणाऱ्या अशा उत्सवांना पाठिंबा देण्यास वचनबद्ध आहे.
पहाटे अल्व्होराडा वाजवून उत्सवाची सुरुवात झाली, जिथे एका ब्रास बँडने बेटावर मिरवणूक काढून दिवसासाठी एक वेगळाच सूर निश्चित केला. दुपारपर्यंत, दिवाडी सेंटर येथे पारंपारिक झेंडा मार्चमध्ये मोठ्या संख्येने लोक जमा झाले, ज्याने या कार्यक्रमाचे प्रतीक असलेल्या एकता आणि उत्सवाच्या जुन्या भावनेला पुनरुज्जीवित केले.
सांस्कृतिक आकर्षणात भर घालत, आसिलो ग्राउंड्स येथे झालेल्या अखिल-गोवा वेशभूषा स्पर्धेने प्रेक्षकांना सर्जनशीलता, विनोद आणि उत्साहाने आनंदित केले. तर बहुप्रतिक्षित फ्लोट परेडमध्ये बेटाचे रस्ते, रंग आणि कल्पनाशक्तीच्या नेत्रदीपक कॅनव्हासमध्ये रूपांतरित झाले.
संध्याकाळ होत असताना, जंक्शन, २४ के इंडिया आणि हेडलाइनर रायन नोगर यासारख्या लोकप्रिय कलाकारांच्या आकर्षक सादरीकरणासह झालेल्या लाइव्ह मनोरंजनाने उत्साहात अधिकच भर पडली. आयशा बरेटो आणि जोएड अल्मेदा यांनी सूत्रसंचालन केलेल्या या कार्यक्रमाने संगीत प्रेमी, स्थानिक आणि अभ्यागतांना एकत्र आणले, ज्यामुळे आनंद आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले.
बोंदेरा हा गोव्यातील सर्वात प्रतिष्ठित आणि उत्सुकतेने वाट पहिला जाणाऱ्या मान्सून महोत्सवांपैकी एक का आहे, हे रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या संगीत, नृत्य आणि उत्साहासह, बोंदेरा २०२५ने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.