- संजय सेंटरच्या विद्यार्थ्यांनी प्रगत तंत्रांच्या साह्याने बनविल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती
गोवा खबर : दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेल्या पर्वरी येथील संजय विशेष शिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक समाज कल्याण आणि दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले.
शिक्षक आणि पालकांनी त्यांच्या कलात्मक प्रतिभेला चालना देण्यासाठी त्यांना प्रेरित करण्याच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. पणजीतील बालभवन संस्थेच्या सहकार्याने म्हापसा कलाकिर्ती संस्थेद्वारे आयोजित केलेल्या गणेश मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेच्या समारोप समारंभात मंत्री फळदेसाई बोलत होते.
९ ते १२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा-२०२५ दरम्यान विद्यार्थ्यांना लाईव्ह स्ट्रीट वर्कस्टेशनद्वारे त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी उपलब्ध करून देण्याची सूचना याप्रसंगी राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी केली. त्यांनी पुढे घोषणा केली की, पारंपरिक शिक्षण घेऊ शकत नसलेल्या दिव्यांग व्यक्तींसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली, गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे व्यावसायिक समतुल्यता प्रमाणपत्र सादर करणार आहे.
कार्यक्रमाचे स्वागत करताना, म्हापसा कलाकीर्तीच्या प्रेरणा पावसकर यांनी सांगितले, की संजय स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी अशा कार्यशाळा आयोजित केल्या जातात. या वर्षीचे प्रशिक्षण व्यावसायिकदृष्ट्या अधिक केंद्रित होते, ज्यामध्ये मूर्ती विक्रीसाठी तयार केल्या जात होत्या.
संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवून त्यांच्यातील प्रतिभेची चुणूक दाखवली. शाडू मातीपासून बनविलेल्या मूर्ती पूर्णपणे पर्यावरणपूरक आणि पाण्यात विरघळणाऱ्या असतात. लालबागचा राजा आणि उंदरावर आसनस्थ बाप्पा अशा विविध स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांनी या मूर्ती घडविल्या असून यातून तीन वर्षांचे सतत व्यावसायिक प्रशिक्षणाची व्यापकता, नजाकत्मकता, बारकावा दिसून येतो.
बालभवन केंद्र-पणजी येथील प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली, विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रांचा अवलंब केला आणि पारंपरिक विधींचे पालन करून मूर्ती घडविल्या. पहिल्यांदाच, या गणेशमूर्ती संजय सेंटर- पर्वरी येथे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रत्येकी ₹ २०००च्या वाजवी किमतीत या मूर्ती खरेदी करून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन संजय सेंटर-पर्वरीच्या व्यवस्थापन मंडळाने केले आहे.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये संजय स्कूलचे लेखा अधिकारी पावलो रॉड्रिग्ज; बालभवनचे प्रेमानंद कुंभार; संजय स्कूलचे मुख्याध्यापक तातू कुडाळकर यांचा समावेश होता. शिक्षिका रंजीता नार्वेकर, दीपेश शेटकर, संजय मांद्रेकर आणि रवी हरमलकर यांनी प्रशिक्षण सहाय्य प्रदान केले. श्वेता हरमलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
पारंपरिक मातीच्या मूर्ती बनवून पर्यावरणपूरक, शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देताना, दिव्यांग तरुणांना सर्जनशील आणि उद्योजकीय कौशल्यांनी सक्षम बनविण्याबाबत गोवा राज्याने बाळगलेली वचनबद्धती या उपक्रमातून प्रतिबिंबित होते.