गोवा खबर : आधुनिकतेच्या लाटेत हरवलेला हा संगीत प्रकार तरुण पिढीत पुन्हा जागृत व्हावा म्हणून कॉम्यूनीकार ट्रस्ट ने नुवे येथील कार्मेल कॉलेज आणि म्हापसा येथील सेंट झेवियर्स कॉलेज येथे विध्यार्थ्यांसाठी दोन विशेष कार्यक्रम आयोजित केले होते.
गोव्यातील जेनझी पिढी रॅप, हिप-हॉप, रॉक आणि पॉप या आंतरराष्ट्रीय संगीतप्रकारांमध्ये हरवलेली दिसते. युट्यूब, स्पोटिफाय, साऊंडक्लाऊड यांसारख्या आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मवर हे संगीत बोटांच्या एका स्पर्शाने उपलब्ध होत असल्याने त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा तोच एक नवा साउंडट्रॅक झाला आहे. परंतु एकेकाळी संगीत ऐकण्याचा अनुभव अगदी वेगळाच होता. घरातल्या एका कोपऱ्यात ठेवलेला ग्रॅमोफोन, काळजीपूर्वक जपून ठेवलेल्या शेलॅक डिस्क्स, आणि त्यावर ठेवलेली सुई जेव्हा हळूवारपणे फिरू लागायची तेव्हा घराघरांत सूर गूंजायचे. त्या काळातील गोव्याचे कांतार. आपल्या भाषेत, आपल्या भावनांमध्ये व्यक्त झालेले गीत – हेच तेव्हा मनोरंजनाचे आणि अभिव्यक्तीचे प्रमुख साधन होते.
आजच्या पिढीला या वारशाची ओळख किती आहे? रॅपच्या दमदार तालांमध्ये आणि रॉकच्या गिटार रिफ्समध्ये रमणाऱ्या युवकांना गोव्याच्या विवाहसोहळ्यांत (विशेषतः कजारांमध्ये) किंवा मैफिलीत घुमणाऱ्या कांतारांची मधुरता अनुभवायला मिळाली तर त्यांना आपल्या मातीतल्या सांगीतिक परंपरेचे खरे सौंदर्य उमगेल. कारण कांतार हे फक्त गाणं नाही, तर त्या काळातील गोमंतकीय समाजजीवनाचं, नात्यांचं, भावना आणि कथा सांगण्याचं एक जिवंत चित्र आहे.
सी. अल्वारेस, रॉबिन वाझ, ऑस्लांडा दे’सूझा, ओफेलिया कॅब्रल आणि अँटोनेट मेंडिस यांसारख्या कलाकारांची नवे तशीच त्यांची प्रसिद्ध ‘कांतारा’ (गाणी) विध्यार्थ्यांना दाखवायची होती, सुरुवातीला ही नावं मुलांसाठी नवीन होती, पण जसजसा कार्यक्रम रंगत गेला, तसतशी ती नांव त्यांच्या मनात रुळू लागली.
नलिनींचा ‘कांतारा’ प्रवास २०२१ मध्ये पोर्तुगालमध्ये सुरू झाला. मास्टर्सच्या अभ्यासादरम्यान त्यांना ४०० जुने ‘शेलॅक डिस्क’ मिळाले. त्यापैकी बहुतेक गाणी ‘कांतारा’ प्रकारातील होती. “आजच्या मुलांना डिस्क, व्हिनाइल, कॅसेट अशा जुन्या साधनांची ओळखच नाही. म्हणूनच मी शाळांमध्ये हा कार्यक्रम सुरू केला,” नलिनी सांगतात. त्या या कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक होत्या.
कार्यक्रमात संगीतासोबत तंत्रज्ञानाचा प्रवासही सुंदरपणे उलगडण्यात आला, शेलॅक डिस्कपासून कॅसेटपर्यंत आणि तिथून थेट आजच्या यूट्यूब आणि स्पॉटिफायपर्यंत. काळाच्या ओघात काही गाणी हरवली, कारण ती नव्या माध्यमांपर्यंत पोहोचलीच नाहीत. तरीही, आजच्या मुलांनी ‘पिपिर्मीट’ आणि ‘रॉक अँड रोल’सारखी गाणी मन लावून ऐकली. शेवटी तर त्यांनी आग्रहाने ‘नाचोयाम कुम्पासार’ वाजवून घेतलं आणि मग सगळेच उत्साहात मोठ्याने गाऊ लागले.
गाणी, नाच, आणि जुन्या काळाच्या गोड आठवणी,असा हा ‘कांतारा’चा दिवस मुलांसाठी खास ठरला. आणि कदाचित, आता त्यांच्या मनात ही गाणी कायमची घर करून राहतील.