गोवा खबर

मुरगाव बंदरातून कंटनेर शिपिंग व्यवसायाच्या पुनरुज्जीवनामुळे गोव्यातील व्यापाराला मिळणार चालना : माविन गुदिन्हो

Published

on

Spread the love

गोवा खबर : डेल्टा पोर्ट्स मुरगाव टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेडने मुरगाव पत्तन न्यास (एमपीए) च्या सहयोगाने आणि गोवा-आयडीसीच्या सहकार्याने आयोजित केलेली व्यापार परिषद (ट्रेड मीट-२०२५)मध्ये, मुरगाव बंदरातून कंटेनर शिपिंग पुनरुज्जीवित करण्याच्या स्पष्ट दृष्टिकोनासह यशस्वीरित्या संपन्न झाली. जागतिक व्यापार संबंध वाढवण्यावर आणि भारताच्या लॉजिस्टिक्स व पुरवठा साखळी क्षेत्रात राज्याला स्पर्धात्मक केंद्र म्हणून स्थान देण्यावर भर देऊन या बैठकीने गोव्याच्या सागरी व्यवसाय क्षेत्रात नव्या युगाची पायाभरणी केली.

प्रमुख पाहुणे म्हणून, गोवा राज्याचे परिवहन, उद्योग, पंचायत राज आणि शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो; मुरगाव पत्तन न्यासचे व्हा. चेअरमन विनायक राव; गोवा-आयडीसीचे चेअरमन आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स; डेल्टा पोर्ट्स मुरगाव टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन अहमद मोहिउद्दिन; गोवा-आयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रविमल अभिषेक (आयएएस); आणि डेल्टा पोर्ट्स मुरगाव टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शमील अहमद यांची प्रमुख उपस्थिती ट्रेड मीट २०२५मध्ये राहिली.

गुदिन्हो म्हणाले, मुरगाव बंदरातील कंटेनर सेवांचे पुनरुज्जीवन हे एक स्वागतार्ह पाऊल आहे. यामुळे लॉजिस्टिक्स सेवा सुलभ होईल, व्यवसायांसाठीचे खर्च कमी करेल आणि गोव्याच्या उद्योगासाठी नवीन संधी उघडेल. बंदरासाठी नैसर्गिकदृष्ट्या आवश्यक बलस्थान असलेल्या या बंदराचा राज्याच्या व देशाच्या विकासासाठी प्रभावी वापर झाला पाहिजे. व्यापार वाढविण्याबरोबरच जागतिक औषध निर्मितीमध्ये ८% पेक्षा जास्त योगदान देणाऱ्या औषधनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहनही या बंदराच्या व्यापार विकासामुळे होणार आहे. क्रेनसह सुधारित पायाभूत सुविधांच्या विकासाच्या माध्यमातून, एमपीएद्वारे योग्य पावले उचलली जात आहेत. या सुविधांचा अधिकाधिक लाभ घेत राज्याच्या आर्थिक व व्यावसायिक विकासाला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आम्ही राज्यातील सर्व उद्योग, व्यवसाय संस्थांना यानिमित्ताने करत आहे.

आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी औद्योगिक विकासात लॉजिस्टिक्स क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला आणि राज्यातील उद्योगांसाठी कार्यक्षम पुरवठा साखळी सक्षम करण्यासाठी आणि नवीन संधी निर्माण करण्यासाठी गोवा-आयडीसीकडून पूर्ण सहकार्याची खात्री दिली.

बंदराच्या दीर्घ वारशाचे प्रतिबिंबित करताना, मुरगाव पत्तन न्यासचे व्हा. चेअरमन विनायक राव म्हणाले, १८८५ पासून मुरगाव बंदर गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. खाणकाम बंदीसारखी आव्हाने असूनही, हे बंदर आता पुन्हा विकासाच्या मार्गावर आहे. कंटेनर सेवांचे पुनरुज्जीवन आणि डेल्टा पोर्ट्ससोबतच्या ३० वर्षांच्या सवलत करारामुळे, आम्ही मुरगाव बंदर एक समृद्ध कंटेनर हब म्हणून पुन्हा स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहोत.

गोवा-आयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रविमल अभिषेक, आयएएस म्हणाले मुरगाव बंदरातील कंटेनर टर्मिनलचे कार्यान्वित होणे हा एक दीर्घकाळापासून प्रतीक्षित टप्पा आहे जो लॉजिस्टिक्स खर्च कमी करून आणि जलद निर्यात सक्षम करून गोव्याच्या एमएसएमई आणि उद्योगांना थेट फायदा देईल. जेएनपीटी आणि नवी मुंबईला माल वाहतूक करण्याऐवजी, आमचे उद्योग आता गोव्यात जागतिक दर्जाच्या सुविधा मिळवू शकतात.

शमिल अहमद म्हणाले गोवा नेहमीच एक राष्ट्रीय सागरी प्रवेशद्वार राहिले आहे आणि आधुनिक पायाभूत सुविधा आणि मल्टीमोडल कनेक्टिव्हिटीसह, मुरगाव बंदर कंटेनर हब म्हणून पुन्हा उदयास येण्यासाठी अनुकुल स्थिती आहे. एमपीएसोबतच्या आमच्या ३० वर्षांच्या सवलत करारासह, डेल्टा पोर्ट्स लॉजिस्टिक्स खर्च कमी करण्यासाठी, जलद सेवा सुनिश्चित करण्यासाठी आणि व्यापारी समुदायासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. चार दशकांच्या जागतिक अनुभवाच्या आधारे, या व्यवसाय क्षेत्रामध्ये विश्वासार्हता, कार्यक्षमता वाढविण्याबरोबरच आणि सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करत गोवा राज्यास भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील स्पर्धात्मक केंद्र बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

कार्यक्रमाचे प्रमुख मुद्दे-

• मुरगाव पत्तन न्यास (एमपीए): बंदराची धोरणात्मक आणि क्षमता विकासाची जबाबदारी

• गोवा आयडीसी: कंटेनर सेवेच्या माध्यामातून व्यवसायांसाठी लॉजिस्टिक्स खर्च कमी करणे, कार्यक्षमता वाढविणे आणि औद्योगिक विकासाला प्रोत्साहन देण्याची भूमिका

• डेल्टा पोर्ट्स इंजिनिअरिंग टीम: बर्थ क्रमांक १० आणि ११मध्ये आधुनुकीकरण करणे आणि कार्गो हाताळणी क्षमतेचा विकास.

“एका नव्या अध्यायाला प्रारंभ: गोवा पत्तन न्यासातील सेवांचे पुनरुज्जीवन करणे, विस्तार करणे याबाबत विविध कार्यघटकांमध्ये सुसंगती वाढवणे” या विषयावरील चर्चासत्रामध्ये  विनायक राव (एमपीए), शमिल अहमद (डेल्टा पोर्ट्स),  सी. एम. मुरलीधरन (युनिफिडर) आणि किशोर प्रभात (डेक्कन केमिकल्स) यांच्यासह उद्योग तज्ञांचा सक्रिय सहभाग राहिला. या सत्रात गोव्याच्या सागरी परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी सहयोगी प्रयत्न राबविण्याच्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यात आला.

भारताच्या लॉजिस्टिक्स क्षेत्रामध्ये गोव्याला एक मजबूत केंद्र आणि जागतिक व्यापारासाठी देशाचे स्पर्धात्मक प्रवेशद्वार म्हणून स्थापित करण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन करत या उपक्रमाची सांगता झाली.

Trending

Exit mobile version