गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन जे नवे कायदे आणले आहेत, त्याचा थेट फायदा सामान्य जनतेला होणार आहे. विशेषतः अल्वारा जमिनीवरील तसेच सरकारी जमिनीवरील बेकायदेशीर घरे आता कायदेशीर होऊ शकतील, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले.
वाळपई येथे गणेश चतुर्थीच्या भेटीवेळी ते लोकांशी संवाद साधत होते. सत्तरी तालुक्याचा सर्वांगिण विकास हे माझे ध्येय आहे. युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नांवरही सरकार तोडगा काढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पत्रकार परिषदेत राणे यांनी सांगितले, सरकार जमिनींच्या कागदपत्रांची पडताळणी करून योग्य हक्क प्रदान करत आहे. घरे कायदेशीर करण्याचे महत्त्वाचे काम मार्गी लागले आहे. भाजप सरकारने सर्व समाजघटकांना न्याय्य प्रतिनिधित्व दिले असून, ‘सबका साथ सबका विकास’ या तत्त्वावर वाटचाल सुरू आहे.
त्यांनी स्पष्ट केले, स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे काँग्रेसने शासन केले, पण अनुसूचित जमातींना त्यांचे हक्क मिळवून देण्यात ते अपयशी ठरले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छाशक्तीमुळे आज त्यांना राजकीय आरक्षण आणि न्याय्य हक्क प्राप्त होत आहेत.