गोवा खबर

आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांचा गोव्याला फटका; अनोळखी सोशल मीडिया ग्रुप्समुळे प्रकरणांत वाढ : पवार

Published

on

Spread the love

गोवा खबर : भारतातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (एनबीएफसी) आणि बजाज फिनसर्वचा भाग असलेली बजाज फायनान्स लिमिटेड (बीएफएल) हिने गोव्यातील म्हापसा येथे ‘नॉकआऊट डिजिटल फ्रॉड’ ही सायबर फसवणूक जनजागृती मोहीम आज आयोजित केली. विविध प्रकारे करण्यात येणारी आर्थिक फसवणूक आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी सर्वोत्तम पद्धती यांबाबत या मोहिमेत डिजिटल वापरकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

रिझर्व्ह बँकेने एनबीएफसी क्षेत्रासाठी ‘फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट’विषयक मार्गदर्शक तत्त्वे गेल्या वर्षी आखून दिली. त्यांनुसार ही मोहीम आयोजित करण्यात आली. फसवणूक होत असल्याचा तातडीचा इशारा, कर्मचाऱ्यांची त्याबाबतची जबाबदारी आणि सार्वजनिक सहभाग यांवर या मोहिमेत भर देण्यात आला. डिजिटल जग सुरक्षित व्हावे, हा यामागील हेतू आहे.

या कार्यक्रमात बोलताना गोवा सायबर क्राईम पोलीस निरीक्षक विद्यानंद पवार म्हणाले, डिजिटल आणि ऑनलाइन फसवणुकीमागे अज्ञान, लोभ आणि भीती ही तीन मुख्य कारणे असतात. दररोज हजारो लोकांची फसवणूक होते आणि कोट्यवधी रुपये गमावले जातात. ही संख्या वाढतच आहे. गुंतवणूक आणि डिजिटल अरेस्ट या संदर्भातील प्रकरणांचा गोव्याला सर्वाधिक फटका बसला आहे.

पवार पुढे म्हणाले, आणखी एक मोठा फसवणुकीचा प्रकार म्हणजे ऑनलाईन गेमिंग आणि चायनीज अॅप्सद्वारे होणारे गैरव्यवहार. हे प्रकार टाळण्यासाठी पालकांनी मुलांवर लक्ष ठेवले पाहिजे. मुलांना मोबाईल फोन देताना विशिष्ट खबरदारी घेण्यात यावी.

म्हापशातील कोरलिम येथील श्रीदोरा काकुलो कॉलेज ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेचे प्राचार्य संतोष पाटकर या प्रसंगी म्हणाले, डिजिटल आणि सायबर फसवणूक यांची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. आपण त्यांबद्दल वृत्तपत्रांत वाचतो. सायबर गुन्हेगार अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करतात. डिजिटल साक्षर असलेले लोकसुद्धा या फसवणुकींना बळी पडतात. याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करणे गरजेचे आहे. जागरुकतेची ही मोहीम सुरू केल्याबद्दल आम्ही बजाज फायनान्सचे आभार मानतो आणि अशा उपक्रमांचे स्वागत करतो.

बजाज फायनान्स कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले, ग्राहकांची आर्थिक सुरक्षितता आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. सायबर सुरक्षित राहण्यासाठी आम्ही सातत्याने ऑनलाईन आणि ऑफलाईन सल्ले देत असतो.

या कार्यक्रमात उपप्राचार्या स्मृती बोरकर, सहाय्यक प्राध्यापिका ऋता केंकरे, पूनम नवेळकर, कवीर शिरोडकर, गुरुप्रसाद नामशिकर आणि महाविद्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.

नॉकआऊट डिजिटल फ्रॉड या उपक्रमांतर्गत वैयक्तिक आणि संवेदनशील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी टिप्स दिल्या जातात. ओटीपी, पिन हे क्रमांक शेअर न करणे; संशयास्पद ईमेल, एसएमएस, लिंक्स, क्यूआर कोड यांवर क्लिक न करणे आणि अनोळखी अॅप्स डाउनलोड न करणे यांबाबत या उपक्रमात शिक्षित केलेल जाते. मोठ्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये कार्यशाळा, डिजिटल जागरूकता मोहिमा आणि समुदाय संपर्क कार्यक्रमही या उपक्रमांतर्गत कंपनीतर्फे आयोजित केले जातात.

Trending

Exit mobile version