गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज जुने सचिवालय पणजी येथे भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात तिरंगा फडकविल्यानंतर जनतेसमोर बोलताना राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. राज्याचे उज्ज्वल, सुरक्षित भविष्य लक्षात घेऊन राज्याला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी सरकार प्रत्येक क्षेत्रात पावले उचलत आहे असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
त्यांनी पुढे बोलताना राज्याचा आर्थिक विकास मोठ्या उद्योगांवर अवलंबून आहे असे सरकारचे मत आहे आणि म्हणूनच गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या माध्यमातून राज्यात रोजगार निर्माण करणाऱ्या हरित उद्योगांसाठी दरवाजे खुले ठेवण्याचा त्यांचा मानस आहे असे सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी डबल इंजिन सरकारमुळे आरोग्य, शिक्षण, क्रीडा उद्योग आणि इतर क्षेत्रात सरकार मजबूत पायाभूत सुविधा विकसित करू शकलो. लोकांच्या दाराशी प्रशासन पोहोचविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. गोव्यातील लोकांच्या आशा आणि आकांक्षा भविष्यात विकसित भारतचा पाया रचतील. हॉस्पिटॅलिटी उद्योग क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी संपूर्ण गोव्यात १३ आयटीआयद्वारे विविध अभ्यासक्रम राबविण्यात आले आहेत. गोवा मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप धोरणाव्यतिरिक्त, राज्यातील २७००० तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून दिली जाते. महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी आरडीए खात्यामार्फत विविध योजना राबविण्यात आल्या आहेत असे सांगितले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की आदिवासी गोव्यातील अनुसूचित जमाती समुदाय अनेक वर्षांपासून त्यांच्या जमिनीच्या मालकी हक्कांपासून वंचित होता आता सरकारने तो मंजूर केला आहे. याशिवाय, राज्याच्या विकासात त्यांची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये रोजंदारी कामगार म्हणून काम करणाऱ्यांना तात्पुरता दर्जा देऊन त्यांना विशेष वेतनवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
शाळांसाठी पुरेशा पायाभूत सुविधा पुरवण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर भर देत मुख्यमंत्र्यांनी कुजिरा शाळा संकुलाच्या अनुषंगाने सरकार मडगाव येथे शाळा संकुल बांधण्याचा मानस असल्याचे सांगितले. गोवा विद्यापीठाने ए+ नॅक मान्यता मिळविली आहे. या विद्यापीठाच्या परिसरात गोवा कॉलेज ऑफ फार्मसी, ललित कला महाविद्यालय, गोवा कॉलेज ऑफ होम सायन्स, गोवा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, गोवा कॉलेज ऑफ म्युझिक यासारख्या प्रतिष्ठित संस्थांसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यांनी आपली एकता मजबूत करण्याचे आणि राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी पुन्हा समर्पित करण्याचे आवाहन केले.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांहस्ते पुरस्कार प्रदान आणि सत्कार करण्यात आला. विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक उपमहानिरीक्षक श्री बॉस्को जॉर्ज आयपीएस (निवृत्त), उपमहानिरीक्षक, श्रीमती सुनीता सावंत, उपमहानिरीक्षक श्री सिद्धांत शिरोडकर यांना प्रदान करण्यात आले. गुणवंत सेवेसाठी पोलीस पदक उपमहानिरीक्षक श्री विल्सन सी. डिसोझा, उपमहानिरीक्षक श्री तुषार एन. नार्वेकर, हेड कॉन्सटेबल श्री दामोदर मयेंकर यांना प्रदान करण्यात आले. तर गुणवंत सेवेसाठी राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक अधिकारी श्री उल्हास गावकर यांना प्रदान करण्यात आले. अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा खात्याचे संचालक श्री नितीन व्ही. रायकर आणि श्री प्रविमल अभिषेक पोलुमतला आयएएस (कार्मिक) यांना गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाचे नोडल अधिकारी, गोवा लोकसेवा आयोगाचे सचिव श्री गौरेश कुर्टीकर, स्वयंपूर्ण मित्र विभागिय कृषी अधिकारी श्री धीरज एस. परब, विभागिय महसूल अधिकारी श्रीमती सेलिना मारिया रॉड्रिग्ज, गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक, श्री रजत आर. चितारी सां बां. खात्याच्या कार्यकारी अभियंता रोसालिना कायतानो बोर्जेस यांचाही सत्कार करण्यात आला.
सुरवातीस मुख्यमंत्र्यांनी संचलनाची पाहणी केली.
या कार्यक्रमाला महसूल मंत्री श्री अतानासियो मोन्सेरात, खासदार राज्यसभा श्री सदानंद शेट तानावडे, विरोधी पक्षनेते श्री युरी आलेमाव, आमदार श्री रुडोल्फ फर्नांडिस, राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कॅन्डावेलू, क्रीडा सचिव श्री संतोष सुखदेव आयएएस, श्री आलोक कुमार आयपीएस, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सरकारचे सचिव, विविध सरकारी खात्यांचे प्रमुख, स्वातंत्र्य सैनिक, स्थानिक नागरिक आणि इतर उपस्थित होते.