गोवा खबर:मत्स्योध्योग मंत्री श्री. नीलकंठ हळर्णकर यांनी आज पेडणे येथील उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात राष्ट्रध्वज फडकविला. यावेळी त्यांनी संचलनाची पाहणी केली.
यावेळी बोलताना श्री. हळर्णकर यांनी पेडणेच्या लोकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि १५ ऑगस्ट हा दिवस आपल्या भारतीयांसाठी खूप आनंदाचा आणि अभिमानाचा आहे असे सांगितले. भारत जवळजवळ २०० वर्षे गुलाम होता. आपण भारतीयांनी संघर्षांचा इतिहास रचला आहे, आपल्या देशाने सांस्कृतिक, वैचारिक, धर्मनिरपेक्ष, नागरी समानता, स्वातंत्र्य, बलिदान इत्यादींचा इतिहास रचला आहे. आपल्या सैनिकांनी आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले प्राण अर्पण केले असेही ते म्हणाले.
आज, भारत अवकाश संशोधन, विज्ञान, आरोग्य, रस्ते, नेटवर्क इत्यादी क्षेत्रात विकास आणि प्रगती करीत आहे आणि या कामगिरीचे श्रेय त्यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना दिले.
त्याचप्रमाणे गोव्यातील लोकांच्या भल्यासाठी अथक परिश्रम करण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांबद्दल त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या गतिमान नेतृत्वाचे कौतुक केले. केंद्र सरकारच्या मदतीने मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पर्यटन, आरोग्य, शिक्षण, उद्योग, शेती, पशुपालन आणि अन्न सुविधा अशा प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधली आहे असेही ते म्हणाले.
अंत्योदय धोरणाच्या माध्यमातून सरकार ज्या सरकारी योजना आणि सुविधा लोकांना त्यांच्या दाराशी पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले.
या प्रसंगी गोवा हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष आणि आमदार श्री प्रवीण आर्लेकर, पेडणेचे नगराध्यक्ष श्री मनोज हरमलकर, पेडणेचे उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी श्री. शिवप्रसाद नाईक, मामलेदार पेडणे, श्री. रणजीत साळगावकर, नगरसेवक, नागरिक, सरकारी अधिकारी आणि इतर उपस्थित होते.
विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात आणि समारोप झाला.
श्रीमती पाविता गणपुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.