गोवा खबर

खासदार निधीतून साकारलेल्या बाल उद्यानाचे श्रीपाद नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर : उत्तर गोवा लोकसभा मतदार संघातील जुने गोवा येथील इला निवासी परिसरात खासदार निधीतून  नव्याने तयार करण्यात आलेल्या बाल उद्यानाचे उद्घाटन केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सिद्धेश नाईक, जुने गोवा पंचायतीच्या सरपंच मेधा पर्वतकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजकारण हे जनतेच्या सेवेसाठी असायला हवे या उदात्त धोरणातूनेच आपल्या खासदार निधीतून जनतेसाठी सामुदायीकरित्या उपयुक्त ठरणारे विकास प्रकल्प आपण आपल्या मतदार संघात राबवत असल्याचे नाईक यांनी यावेळी बोलताना सांगितले. आपल्या  27 वर्षांच्या खासदारकीच्या कार्यकाळात अनेक लोकोपयोगी प्रकल्प  खासदार निधीतून उत्तर गोवा मतदार संघात आणले आहेत ज्याचा दीर्घकाळ लाभ येथील जनतेला मिळत आहे असे नाईक म्हणाले.

एक सर्वेक्षणानुसार देशभरातल्या सुमारे 800  लोकसभा आणि राज्यसभा खासदारांच्या निधीतून राबवण्यात आलेल्या प्रकल्पांच्या यादीत गोव्यातील उत्तर गोवा मतदारसंघ 10 -11 व्या स्थानावर असल्याचे नाईक म्हणाले. खासदार निधीतून जन कल्याणाची कामे व्हावीत त्यासाठी आपले प्रयत्न असून जनतेवर उपकार नव्हे तर ते लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्यच आहे असे नाईक यांनी सांगितले. जिल्हा परिषद, पंचायत आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमतून आणि सहकार्यातून लोकहिताची कामे आपण यापुढेही सुरूच ठेऊ असे आश्वासन नाईक यांनी यावेळी बोलताना दिले.

याच कार्यक्रमात इला निवासी परिसरातील 10 वी आणि 12 वी शालांत परीक्षेत उच्चश्रेणित उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार मंत्री  श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

 

Trending

Exit mobile version