गोवा खबर

आदर्श शिक्षक हा समाजाचा कायम प्रेरणास्त्रोत : पार्सेकर

Published

on

Spread the love

गोवा खबर : राजकारणी निवृत्त झाल्यावर त्याला ‘माजी’ अशी पदवी मिळते, पण शिक्षक आयुष्यभर शिक्षकच राहतो आणि समाज त्याला तसाच सन्मान देतो. पैशाने विकत घेतलेले गौरव टिकत नाहीत; गावागावात, कार्याची खरी दखल घेऊन होणारे सत्कारच मानाचे असतात, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले.

दत्तात्रेय देवस्थान येथे साई सच्चरित्र पारायण सोहळ्यानिमित्त दत्तकला सांस्कृतिक क्रीडा मंडळामार्फत जेष्ठ नागरिक, गायक-कलाकार आणि शिक्षकांचा सत्कार सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पार्सेकर यांनी आदर्श कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माजी आमदार दयानंद सोपटे, देवस्थान समिती अध्यक्ष दिलीप बागकर, संघ अध्यक्ष बाबी बागकर, पंडित महादेव पेडणेकर, मृण्मयी पेडणेकर, ज्येष्ठ सत्कारमूर्ती प्रकाश च्यारी, माजी मुख्याध्यापक दयानंद मांद्रेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सिया परब यांनी केले.

पार्सेकर म्हणाले, आजकाल काही ठिकाणी पैसे घेऊन पुरस्कार दिले जातात. अशा पैशाने मिळालेल्या गौरवाला समाज कधीच खरी दखल देत नाही. कार्याची खरी किंमत ओळखून गावपातळीवर होणारे मानाचे सत्कारच समाजाला आदर्श घडवतात.

या प्रसंगी पंडित महादेव पेडणेकर, माजी मुख्याध्यापक दयानंद मांद्रेकर, प्रकाश च्यारी, गोविंद च्यारी व निळू बागकर यांचा माजी मुख्यमंत्री पार्सेकर व माजी आमदार सोपटे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

माजी आमदार दयानंद सोपटे यांनी सामाजिक संस्थांकडून होणाऱ्या अशा गौरव कार्यक्रमांचे स्वागत करताना, सत्कार हा लहानमोठा नसतो, तो मानाचा तुरा असतो, असे सांगितले.

उद्योजक बाबी बागकर यांनी दत्त मंदिरातून कला, साहित्य, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून नवीन कलाकार घडवण्याचे कार्य पुढेही सुरू राहील, अशी ग्वाही दिली.

पंडित महादेव पेडणेकर व दयानंद मांद्रेकर यांनी सत्काराला उत्तर देऊन आयोजकांचे आभार मानले.

Trending

Exit mobile version