गोवा खबर

फोंडा येथील मर्दनगडाला पुरातत्त्वखात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांची भेट

Published

on

Spread the love


मर्दनगडाच्या संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार ! – सुभाष फळदेसाई, मंत्री, पुरातत्व खाते

गोवा खबर:धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी गोव्यातील हिंदूंना न्याय देण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले आहे आणि याचा फोंडा येथील मर्दनगड साक्ष आहे. मर्दनगडासंबंधी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य, शौर्य यांविषयी पोर्तुगिज दस्तऐवजांमध्ये माहिती उपलब्ध आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वत:हून बांधलेला मर्दनगड हा एकमेव किल्ला आहे, इतर किल्ले त्यांनी इतरांकडे लढून मिळवलेले आहेत. पुरातत्व खात्याने मर्दनगड हे वारसा स्थळ म्हणून अधिसूचित करावे आणि मर्दनगडाचे संवर्धन आणि संरक्षण करावे, अशी मागणी सध्या जोर धरत आहे.

सध्या चालू असलेल्या गोवा विधनासभेच्या पावसाळी अधिवेशनात ८ ऑगस्ट या दिवशी मर्दनगडाचे संवर्धनाची मागणी करणारा ठराव वास्कोचे आमदार कृष्णा साळकर हे मांडणार आहेत. मर्दनगडाच्या संवर्धनासाठी सरकार सर्वतोपरी पर्यत्न करणार आहे, अशी हमी मी देतो. पोतुगिजांनी लिहिलेल्या इतिहासामध्येच मर्दनगड या मराठ्यांच्या किल्ल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे यावर कुणी आक्षेप घेण्याचे कारण नाही. गोमंतक ही भोगभूमी नाही, तर ती देवभूमी, तपोभूमी, आध्यात्मिक भूमी आहे, हे आम्हाला सर्वांना सांगायचे आहे, अशी माहिती पुरातत्त्व खात्याचे मंत्री श्री. सुभाष फळदेसाई यांनी दिली. मंत्री श्री. सुभाष फळदेसाई यांनी ७ ऑगस्ट या दिवशी सकाळी मर्दनगडावर भेट दिली आणि यानंतर बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. या वेळी त्यांच्यासोबत पुरातत्त्व खात्याचे संचालक श्री. निलेश फळदेसाई, इतिहासकार सचिन मदगे, मर्दनगड संवर्धन समिती, ‘अपरांत अस्मिता’, ‘जगदंब ढोलतासे मंडळ’ आदी संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य, वन खात्याचे अधिकारी यांची उपस्थिती होती.


मर्दनगडाच्या संवर्धनाची मागणी करणारा ठराव विधानसभेत ८ ऑगस्ट या दिवशी मांडला जाणार असल्याने मर्दनगडाविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी मंत्री सुभाष फळदेसाई आणि खात्याचे संचालक श्री. निलेश फळदेसाई यांनी मर्दनगडाला ही विशेष भेट दिली. पायी डोंगर चढून मर्दनगडावर गेल्यावर मंत्री सुभाष फळदेसाई यांनी मर्दनगडाचा राहिलेला भुरूज, श्री गडदेवाचे स्थान असलेले ठिकाण, निशाण बुरुज, विहीर, उद्धध्वस्त झालेली तटबंदी तसेच अन्य पडलेले गडाचे अवशेष यांविषयी माहिती इतिहासकार सचिन मदगे आणि इतरांकडून जाणून घेतली. यानंतर तेथे असलेल्या निशाण बुरुजावर मंत्री सुभाष फळदेसाई यांनी भगवा ध्वज फडकावला. तत्पूर्वी मर्दनगड संवर्धन समितीचे मनोज गावकर म्हणाले,‘‘मर्दनगडाचे संवर्धन व्हावे आणि या किल्ल्याविषयी माहिती सर्वांपर्यंत पोचावी, गोव्यात येणार्‍या पर्यटकांना या किल्ल्याविषयी माहिती द्यावी यासाठी समिती प्रयत्नशील आहे’’.

मर्दनगडाविषयी माहिती देतांना इतिहासकार सचिन मदगे म्हणाले,‘‘पोर्तुगिजांच्या आक्रमक धोरणाला सडेतोड उत्तर देण्यासाठी धर्मवीर संभाजी महाराज यांनी मर्दनगड बांधला. हा मर्दनगड त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा किल्ला आहे. दुष्ट शक्तीचा निर्दन करणारा मर्दन गड हा १७ वे शतक आणि १८ शतक्याच्या मध्यापर्यंत फोंडा प्रांताची मुख्य राजधानी म्हणून होता. पोर्तुगिजांनी उद्धवस्त केल्यानंतर इतिहासाच्या पानातून तो दुर्लक्षित झाला होता आणि त्याला पुर्नजीवन देण्यासाठी फोंडा येथील मर्दनगड संवर्धन समिती आणि येथील युवावर्ग प्रयत्नशील आहेत’’. या वेळी मर्दनगड संवर्धन समितीचे सर्वश्री मनोज गावकर, निलेश नाईक, सत्यविजय नाईक, राजेंद्र देसाई, स्वप्निल नाईक, सूचेंद्र अग्नी, अभी शिरोडकर, नरेश भाळवे, प्रद्युम्न नाईक, देवदत्त नाईक, गिरीश नाडकर्णी, नाथकिरण देसाई, मोहन नाईक, सुप्रिया केतकर आदींची उपस्थिती होती.

Trending

Exit mobile version