- सुमारे ३५० कोटी रूपयांचे प्रस्तावित प्रकल्प पर्यटनमंत्री रोहन खंवटेंची विधानसभेत माहिती
गोवा खबर : पर्यटकांचे नंदनवन म्हणून असलेली गोव्याची ओळख जपतानाच, राज्याच्या पर्यटन वृध्दीसाठी सुमारे साडे तीनशे कोटी रूपयांच्या अनेक सकारात्मक बदलांच्या योजना सरकारने आखल्याची माहिती आज पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी विधानसभेत दिली.
पर्यटन खात्याच्या अनुदान मागण्यांवरील सभागृहातील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. विरोधी व सत्ताधारी सदस्यांनी या चर्चेवेळी सभागृहात अनेक सूचना व शिफारशी सरकारला केल्या. त्यांचा आदर करून जसे शक्य असेल, तशा सूचना स्वीकारून पुढे पाऊल मारण्याचे आश्वासनही खंवटे यांनी दिले.
एका झटक्यात सकारात्मक बदलांची अपेक्षा बाळगणे चुकीचे असून आम्ही जे प्रयत्न पर्यटनाच्या प्रसार आणि प्रचारासाठी सुरू केले आहेत, त्यांना यश येण्यासाठी काही अवधी लागेल असे पर्यटनमंत्री खंवटे यांनी सांगितले. हे सांगताना “शनैः शनैः पन्थानं गच्छेत, प्रयत्नेन विनाsपि, किं साध्यते” हे सुभाषित त्यांनी उद्धृत केले.
गोव्यात पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याचा दावा त्यांनी अलीकडेच एका तारांकीत प्रश्नाला उत्तर देतेवेळी सभागृहात खोडून काढला होता. तसेच पर्यटकांमध्ये झालेल्या वृध्दीची आकडेवारीच त्यांनी त्यावेळी सभागृहात दिली होती.
राज्य आणि केंद्रातील डबल इंजिन सरकारच्या प्रयत्नांमुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्राचा वेगाने विस्तार होत असल्याचे ते म्हणाले. जानेवारी ते जून २०२५ दरम्यान, गोव्यात एकूण ५७,१२,७५८ पर्यटकांचे आगमन झाले, ज्यामध्ये ३४,६४,४९० पर्यटक वास्को येथील गोवा दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आणि २२,४८,२६८ पर्यटक मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आल्याचे अलीकडेच पर्यटनमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या ३,२५,८३५ होती, ज्यामध्ये १,१५,६४५ पर्यटक गोवा दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आणि २,१०,१९० पर्यटक मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आले. गेल्या सहा महिन्यांतच दाबोळी आणि मोपा विमानतळांवर सातत्याने पर्यटकांची तोबा गर्दी दिसून आली आहे, हे ही त्यांनी सभागृहात दोन दिवसांपूर्वीच सांगितले होते. हॉटेलमधील खोल्यांची व्याप्ती वर्षभर ७०% ते १००% राहिल्याचेही, त्यांनी नमूद केले होते.
राज्याने कोविडनंतर पर्यटन क्षेत्रात मिळविलेल्या उल्लेखनीय प्रगतीचे दर्शन घडवण्यासाठी त्यांनी महामारीपूर्वीच्या आकडेवारीसह तुलनात्मक विश्लेषण देखील सादर केले होते. त्यानुसार २०१९ मध्ये गोव्यात ७१,२७,२८७ देशांतर्गत आणि ९,३७,११३ आंतरराष्ट्रीय पर्यटकांची नोंद झाली होती, जी एकूण ८०,६४,४०० इतकी होती. २०२४ मध्ये ही संख्या वाढून ९९,४१,२८५ देशांतर्गत आणि ४,६७,९११ आंतरराष्ट्रीय पर्यटकांची नोंद झाली, जी एकूण १,०४,०९,१९६ झाली.
कोविडपूर्व स्थितीच्या तुलनेत ही देशांतर्गत पर्यटनात ३९.४८% वाढ आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनात ५०% सुधारणा दर्शवते. “गोवा पूर्वीपेक्षा अधिक मजबूतीने पुढे आल्याचे स्पष्ट करताना, गोव्यात पर्यटन भरभराटीला येत असल्याचे पर्यटनमंत्री खंवटे यांनी ठामपणे सांगितले होते.
राज्याचे पर्यटन हे केवळ समुद्र किनारे एवढ्यापुरतेच मर्यादीत न ठेवता, समुद्रा पल्याडचा गोवा पर्यटकांनी अनुभवावा यासाठी नव्या सांस्कृतिक, आध्यात्मिक व आंतरग्राम पर्यटनाचे प्रयत्न राबविल्याचे त्यांनी सांगितले. आध्यात्मिक पर्यटन उपक्रमांतर्गत रिजनरेटीव्ह टुरीझमची संकल्पना राबविली आहे. त्याखाली एकादश तीर्थ हे अकरा ऐतिहासिक मंदिरांचे परिमंडळ घडविण्यात आले आहे.
राज्यभरातील शिवजयंती, पर्वरेचा दीपोत्सव, माशेलचा चिखलकालो, गोव्यातील शिगमोत्सव व कार्निव्हल, मोरजीचा अन्न आणि सांस्कृतिक फेस्टीव्हल, साळगांवचा हेरिटेज फेस्टीव्हल, कोलव्याचा स्पिरीट ऑफ गोवा फेस्टीव्हल सारख्या पर्यटनाभिमुख उत्सव आणि कार्यक्रमांना राज्य सरकारने वेगळी उंची प्राप्त करून दिली आहे. शिवोलीचा सां जुआंव, कुंभारजुवेचा सांगोडोत्सव, मडगांवची सुप्रसिध्द दिंडी अशा उत्सवांनाही तशीच उंची मिळवून देण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. केंद्राच्या स्वदेश दर्शन व प्राशाद योजनेचा लाभही गोव्याने उठवल्याचे खंवटे यांनी सांगितले. केंद्राच्या मदतीने फोंडा येथे छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल म्युझियम, पर्वरीत टाऊन स्क्वेअर प्रकल्प, चिंबल येथे युनिटी मॉल सारखे नवे पर्यटनाभिमुख प्रकल्प प्रस्तावित आहेत अशी माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारचा आर्थिक पाठींबा या प्रकल्पांना लाभल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. वेलनेस आनी योगाखाली केरी व हणजुणेत लवकरच काम सुरू होईल असे खंवटे म्हणाले. सुमारे ३५० कोटी रूपयांचे हे सारे प्रकल्प असल्याचे खंवटे यांनी अभिमानाने जाहीर करताना हीच डबल इंजिन सरकारची ताकद असल्याचे अधोरेखित केले.
पर्यटकांची सुरक्षा ही अत्यंत महत्वाची असून त्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. १३६४ मदतवाहिनी क्रमांकासह किनारी पोलिस मदतीसाठी तैनात असल्याचे ते म्हणाले. बिच व्हीजील एप सुरू असून जीवरक्षकही वेगवेगळ्या समुद्रांवर तैनात आहेत. किनारे स्वच्छतेलाही प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटकांसाठी किनार्यांवर आवश्यक त्या सुविधा उभारण्यासाठीही सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त सप्टेंबर महिना हा जागतिक पर्यटन मास पाळण्याची घोषणाही पर्यटनमंत्री खंवटे यांनी केली. हॉटेल्स पर्यटकांनी गजबजलेली आहेत व विमाने खचाखच भरून गोव्यात येताहेत, हे पाहिल्यास पर्यटकांच्या आंकड्यापेक्षा दर्जेदार पर्यटकांची रेलचेल राज्यात होत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे खंवटे म्हणाले.
गोव्याने कोविडनंतरच्या काळात पर्यटन क्षेत्राची स्थिती झपाट्याने सुधारली आहे. गोव्यातील लोकांनी पर्यटन क्षेत्राबद्दल सकारात्मक कथन करण्यात सहभागी व्हावे व यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही पर्यटनमंत्री खंवटे यांनी केले.
खंवटे यांनी सांगितले की, राज्याने पोलंड, उझबेकिस्तान आणि कझाकस्तानसारख्या नवीन पर्यटन बाजारपेठांमध्ये प्रवेश केला आहे. उड्डाणे आणि आंतरराष्ट्रीय जाहिरातींमुळे उभय देशांमधील संबंध वृध्दींगत झाल्याचे त्यांनी सांगितले. रशियाच्या एकटेरिंनबर्गवरून आठवडी विमान सेवा चालू होत असून १३ हजारच्या आसपास पर्यटक अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
गोवा आता जगाच्या अनेक भागांशी जोडलेला आहे, असे ते म्हणाले. देश आणि विदेशातील रोड शो आणि मार्केटिंग मोहिमांनी नवे पर्यटन विभाग आता गोव्यासाठी खुले झाल्याचे खंवटे यांनी सांगितले. व्हीजा ऑन अरायव्हल ही फार मोठी गोष्ट नाही. पण, गोव्याची इतर देशांशी हवाई कनेव्टीविटी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे त्यावरही उभरत्या देशांशी संपर्क चालू आहे, जेथून थेट कनेक्टिविटी सुरू करण्यावर भर दिला आहे. पर्यटन खात्याला मिळालेल्या वेगवेगळ्या पुरस्कारांचा उल्लेख करून त्यांनी गोव्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.
किनारी भागातील शॅकमालक हे पर्यटन व्यवसायाचे राजदूत आहेत. गोव्याची खाद्यसंस्कृती ती जगभर पोचवत असून त्यांच्या समस्यांना प्राधान्य देण्याचे काम सरकारने केल्याचे खंवटे यांनी स्पष्ट केले. गोव्यात पर्यटन योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचे शेवटी मंत्री खंवटे यांनी सांगितले.