गोवा खबर : यंदा २७ ऑगस्ट या दिवशी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यातील लाखो गणेशभक्तांच्या भावना, संस्कृतीप्रेमी जनतेचा अभिमान आणि स्थानिक कलेच्या जपणूक करणे यांसाठी गणेशोत्सवाला गोवा सरकारने ‘राज्य महोत्सव’ म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी गोमतंक मंदिर महासंघाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वो केली आहे.
या वेळी गोमंतक मंदिर महासंघाच्या शिष्टमंडळामध्ये सर्वश्री दीपक गोवेकर, अध्यक्ष, गणेशपुरी विश्वस्त मंडळ, म्हापसा; सुजन नाईक व दिनीन पेडणेकर, गोवा हिंदू युवा शक्ती; सत्यवान म्हामल, हिंदु जनजागृती समिती यांचा समावेश होता. तत्पूर्वी गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून मान्यता देण्याची मागणी करणारे सूत्र विधानसभेच्या चालू अधिवेशनात मांडावे, अशी मागणी करणारे निवेदन वास्कोचे भाजपचे आमदार कृष्णा उपाख्य दाजी साळकर यांच्याकडे करण्यात आली आहे. हे निवेदन मंत्री सुभाष फळदेसाई यांनाही देण्यात आले आहे.
गोमंतक मंदिर महासंघाचे शिष्टमंडळ मंत्री सुभाष फळदेसाई व आमदार कृष्णा साळकर यांना निवेदन देताना.
महाराष्ट्र शासनाने ज्या प्रमाणे गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ घोषित केले आहे, त्या धर्तीवर गोव्यातही निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. या निवेदनात म्हटले आहे की, गोव्यातील गणेशोत्सवाची परंपरा प्राचीन आहे. येथे अनेक पिढ्यांपासून घरगुती व सार्वजनिक स्तरावर गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भजन, फुगडी, दशावतार, पारंपरिक आरास, मूर्तिकला आदी सांस्कृतिक वारसा जपला जातो. गणेशोत्सवामुळे पारंपरिक शाडू मूर्तीकार, निसर्गस्नेही आरास, वाद्य कलाकार आदींना कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत असते. गणेशोत्सवामुळे असंख्य कुटुंबांना आर्थिक आधार मिळतो, तसेच सर्वांमध्ये बंधुभाव निर्माण होत असतो.