गोवा खबर

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पेडणेकरांना ब्ल्यू कॅप टॅक्सी काउंटर

Published

on

Spread the love
  • टॅक्सी व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्र्यांचे आभार

गोवा खबर : मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अखेर पेडणे तालुक्यातील स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांसाठी ब्ल्यू कॅप टॅक्सी काउंटर सुरू करण्यात आला आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, आमदार प्रवीण आर्लेकर, आमदार जीत आरोलकर, वाहतूक संचालक यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांचे टॅक्सी व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर आणि माजी सरपंच तुळशीदास गावस यांनी आभार मानले आहेत.

यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत सुदीप ताम्हणकर यांनी सांगितले, २०२४ साली हा टॅक्सी काउंटर सुरू झाला होता, परंतु सुरक्षा मंजुरीअभावी जीएमआर कंपनीने तो बंद केला होता. त्यामुळे अनेक स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. आंदोलने, न्यायालयीन लढा आणि माहिती अधिकाराखाली माहिती मिळवून हा विषय सातत्याने पुढे नेण्यात आला.

कंपनी रजिस्ट्रेशनच्या अडचणींमुळे स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना काउंटर चालवणे शक्य नव्हते. यानंतर तुळशीदास गावस यांच्या पुढाकाराने व्यवसायिकांमध्ये बैठक घेतली गेली आणि सविस्तर अभ्यास करून उपाययोजना ठरवण्यात आली. मोपा विमानतळावर तसेच दाभोळी विमानतळावर लागू असलेल्या धोरणांचा आढावा घेण्यात आला.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन हा विषय मांडण्यात आला. २ जून रोजी त्यांना अधिकृत निवेदन दिल्यानंतर, त्यांनी वाहतूक खात्याला आवश्यक सोपस्कार पूर्ण करून काउंटर मंजूर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार २३ जून रोजी सर्व औपचारिकता पूर्ण करून काउंटरला अंतिम मंजुरी मिळाली.

करारातील काही अटींबाबतही चर्चेसाठी पुढाकार घेण्यात आला. शुक शुल्क १,४०,००० रुपये ही रक्कम अत्याधिक असल्याने ती कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली. त्यांच्या निर्देशानुसार ती रक्कम कमी करण्यात आली. तसेच काउंटरचे स्थान आणि करारातील टर्मिनेशन अटींबाबतही सुधारणा सुचवून मंजुरी घेण्यात आली.

या निर्णयामागे मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, वाहतूक विभाग, पत्रकार बंधू, आणि स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनी घेतलेला अथक पाठपुरावा आणि एकजुटीचा लढा कारणीभूत ठरल्याचे सुदीप ताम्हणकर यांनी नमूद केले.

तुळशीदास गावस यांनी सांगितले की, गेल्या अनेक महिन्यांपासून चाललेल्या संघर्षानंतर हा काउंटर मिळवण्यात यश मिळाले आहे. या लढ्यात सातत्याने साथ देणाऱ्या मुख्यमंत्री, मंत्रिगण, आमदार, खासदार, पत्रकार आणि व्यावसायिकांचे त्यांनी आभार मानले.

टॅक्सी व्यावसायिकांनीही या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाल्याचे सांगत, सर्व संबंधित व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

Trending

Exit mobile version