- उदरगत ज्येष्ठ नागरिक संमेलनास १६०० हून अधिक जेष्ठ नागरिकांची उपस्थिती
गोवा खबर : मांद्रे गावात माझे कुलदैवत श्री म्हाळसा देवी आहे. त्यामुळे अनेक वेळा येथे येणे होते. गावात नेहमी आमदार जीत विनायक आरोलकर यांचे कार्य झळकताना दिसते. त्यांचे कार्य पाहून ते कार्यक्षम आणि उत्कृष्ट आमदार आहेत हे स्पष्ट होते. त्यांना जेष्ठ नागरिकांचे आशीर्वाद लाभले आहेत, हे त्यांचे खरे भाग्य आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी व्यक्त केले.
उदरगत ज्येष्ठ नागरिक समिती आयोजित जेष्ठ नागरिक संमेलनात मांजरेकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी १६०० हून अधिक जेष्ठ नागरिकांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमात दीपप्रज्वलन करण्यात आले आणि आमदार जीत आरोलकर यांनी मांजरेकर यांचा समई, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला.
जेष्ठ नव्हे, ते श्रेष्ठ!
६० वर्षे वय म्हणजे जेष्ठ नव्हे, ते श्रेष्ठ आहेत. त्यांच्यासाठी क्लब तयार करा, त्यात वर्तमानपत्र, टीव्ही व पौष्टिक आहार मिळेल. त्यांच्या वाढदिवसासाठी खास साजरे करण्यात यावेत, असे आवाहन मांजरेकर यांनी केले.
आमदार आरोलकर यांचे जेष्ठ नागरिकांसाठी घोषणा
संमेलनात बोलताना आमदार जीत आरोलकर म्हणाले, मांद्रे मतदारसंघातील प्रत्येक घर हे माझे घर आहे. गेल्या दोन वर्षांत गावागावात फिरून जेष्ठांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यामुळे पुढील उपाययोजना राबवणार आहे. ते म्हणाले, जेष्ठांनी कार्यालयात औषधांची यादी द्यावी, ती मोफत घरपोच दिली जाईल. तुये, म्हापसा, बांबोळी येथे उपचारासाठी जाण्यासाठी गाडी सुविधा पुरवली जाईल. प्रत्येक गावात विरंगुळा केंद्र स्थापन केले जाईल, ज्यात टीव्ही, वर्तमानपत्र, वाढदिवस साजरे करण्याची सुविधा असेल.
या कार्यक्रमात व्यासपीठावर समाजकल्याण अधिकारी सुप्रिया मांद्रेकर, सरपंच रॉबर्ट फर्नांडिस, पंच मिंगेल फर्नांडिस, अनुपमा मयेकर, सुलक्षा नाईक, सागर तिळवे, श्रीधर मांजरेकर, बबन तारी, उदय मांद्रेकर, सुभाष आसोलकर, प्रविण वायंगणकर, स्वप्नील नाईक, सचिन राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
सांस्कृतिक सादरीकरण आणि सत्कार
कार्यक्रमात सावर्डे कला संगम केंद्र यांच्या गटाने कुणबी नृत्य सादर केले. जेष्ठ शेतकरी, समाजसेवक, कलाकार अशा ९ जेष्ठांचा सत्कार करण्यात आला. संमेलनाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन रूसी परब यांनी केले.