मराठी राजभाषा समितीकडून आमदार शिरोडकर आणि गावडे यांना निवेदन
गोवा खबर : येत्या पावसाळी अधिवेशनात मराठी भाषेचा मुद्दा ठळकपणे मांडावा, अशी मागणी मराठी राजभाषा समितीने शिरोडा मतदारसंघाचे आमदार व जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर आणि प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांच्याकडे केली आहे.
समितीने सोमवारी दोघांनाही निवेदन देत मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी विधानसभा अधिवेशनात दुरुस्ती विधेयक सादर करण्याचे आवाहन केले.
समितीचे गो. रा. ढवळीकर, दिवाकर शिंक्रे, शानुदास सावंत, गोविंद देव, प्रेमानंद तळावलीकर, विनोद पोकळे, मच्छिंद्र च्यारी आणि हनुमंत नाईक यांनी या दोन्ही आमदारांची भेट घेतली. निवेदनात 1987 मध्ये कोकणीला राज्यभाषेचा दर्जा देताना मराठीवर अन्याय झाल्याचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला असून, गोमंतकातील सांस्कृतिक आणि शैक्षणिक संदर्भ देऊन मराठीची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.