मुंबई इंडियन्सने केवळ तीन वर्षांत दुसऱ्यांदा एमएलसी ट्रॉफी जिंकली, मिळवला 13वा जागतिक किताब
गोवा खबर : एमआय न्यूयॉर्कने 2025 चा मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) विजेतेपद पटकावले आहे. अवघ्या तीन हंगामांत मुंबई इंडियन्सचा हा दुसरा एमएलसी चॅम्पियनशिप किताब ठरला आहे. जागतिक स्तरावर मुंबई इंडियन्सचा हा 13वा किताब आहे. एकट्या 2025 सालात मुंबई इंडियन्सने तीन ट्रॉफीज जिंकल्या आहेत. यापूर्वी एमआय केप टाऊनने दक्षिण आफ्रिकेतील SA20 स्पर्धा जिंकली होती आणि वर्षाच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्स महिला संघाने WPL (वुमेन्स प्रीमियर लीग) चे विजेतेपद मिळवले होते.
मुंबई इंडियन्स ही सर्वाधिक यशस्वी जागतिक टी20 फ्रँचायझी क्रिकेट ग्रुप बनली आहे.
नीता एम. अंबानी म्हणाल्या, मुंबई इंडियन्स कुटुंबासाठी हा खरोखरच एक खास क्षण आहे. तीन वर्षांत दुसरी एमएलसी ट्रॉफी जिंकणे हे आमच्या संघाच्या उत्कटतेचे, एकमेकांवरील विश्वासाचे आणि संघभावनेचे प्रतीक आहे. आमचे चाहते – मुंबई इंडियन्स पलटन – यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो, जे नेहमी आमच्यासोबत खंबीरपणे उभे राहिले आहेत. प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक, पाठीराखा आणि आमच्या जागतिक मुंबई इंडियन्स कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे मी अभिनंदन करते.
विजयानंतर आकाश एम. अंबानी म्हणाले, मुंबई इंडियन्समधील आम्हा सर्वांसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. एमआय न्यूयॉर्कने दुसऱ्यांदा एमएलसीचे विजेतेपद मिळवले आहे – भारत, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका येथे यंदाच्या तिहेरी विजयानंतरचा हा एक आनंददायी टप्पा आहे. ही यशोगाथा आमच्या संघांच्या वर्षानुवर्षांच्या विश्वास, संस्कृती आणि बांधिलकीचे प्रतीक आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करणाऱ्या एमआय न्यूयॉर्कच्या प्रत्येक सदस्याचे हार्दिक अभिनंदन.
मुंबई इंडियन्सच्या पाच संघांनी तीन खंडांतील चार देशांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. एकूण 13 चॅम्पियनशिप ट्रॉफीजसह, मुंबई इंडियन्स ही जागतिक टी20 लीगमधील सर्वाधिक यशस्वी फ्रँचायझी आहे – 5 आयपीएल किताब, 2 महिला प्रीमियर लीग किताब, 2 मेजर लीग क्रिकेट किताब, 2 चॅम्पियन्स लीग टी20 किताब, 1 आयएलटी20 किताब (एमआय एमिरेट्स, 2024) आणि 1 SA20 किताब (एमआय केप टाऊन, 2025) यांचा समावेश आहे.