गोवा खबर : ९ ते १२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान गोव्यात होणाऱ्या आगामी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा २०२५च्या माहितीपत्रकाचे (ब्रोशर) अधिकृत प्रकाशन नवी दिल्लीतील यूएन हाऊसमध्ये एका विशेष कार्यक्रमात करण्यात आले. हे प्रकाशन संयुक्त राष्ट्रांचे भारतासाठी निवासी समन्वयक श्री. शोम्बी शार्प यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गोवा राज्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर आणि दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे उपायुक्त प्रवीण अंबस्थ यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी संबोधित करताना शोम्बी शार्प म्हणाले, आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टला पाठबळ देण्याच्या उद्देशाने गोवा सरकार आणि दिव्यांगजन सक्षमीकरण विभागासोबत सहकार्य करणे हा संयुक्त राष्ट्रसंघाचा सन्मान आहे. युनिव्हर्सल डिझाइनला प्रोत्साहन देणे आणि प्रत्येक व्यक्तीचा विकास होईल अशा समावेशक आणि सकारात्मक समाजाची घडण करून दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचा प्रसार करण्याबाबत आमच्या सामायिक वचनबद्धतेचे प्रतिबिंब या सहकार्य भागीदारीतून उमटत आहे.
या वर्षीचा पर्पल फेस्ट संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहकार्याने आयोजित केला जात आहे आणि ‘युनिव्हर्सल डिझाइन’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात विविध क्षमतांचा सोहळा साजरा होणार आहे.
माहितीपत्रकाबरोबरच आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५च्या ठळक वैशिष्ट्यांचे अनावरण देखील यावेळी करण्यात आले. जागतिक स्तरावर प्रसिद्धी, जागतिक स्तरावरील प्रसिद्ध वक्ते व आघाडीच्या स्वयंसेवी संस्थांचा सहभाग; जगभरातील सर्वोत्तम पद्धती तसेच समावेशक धोरणाबाबत चर्चासत्रे आदी वैशिष्ट्यांचा यामध्ये समावेश आहे. हे जागतिक स्तरावीर उपक्रमांचे समन्वयन संयुक्त राष्ट्रसंघ कार्यालयासमवेत केले जाणार असून, याद्वारे समावेशक, सुलभ आणि सकारात्मक समुदाय विकासाला प्रोत्साहन देण्याबाबत असलेली या महोत्सवाची वचनबद्धत आणखी बळकट होणार आहे.
समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट हा गोवा आणि भारताच्या समावेशकतेच्या वचनबद्धतेचे प्रतीक बनला आहे. संयुक्त राष्ट्रांसोबतचा हा सहयोग आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, कारण आम्ही पुन्हा एकदा पुष्टी करतो, की सुलभता हा विशेषाधिकार नाही तर एक मूलभूत अधिकार आहे. ‘युनिव्हर्सल डिझाइन’ ही मार्गदर्शक संकल्पना असल्याने, आम्ही शहरी आणि ग्रामीण भाग अशा दोन्ही भागातून आलेल्या प्रत्येक सहभागी प्रतिनिधीचा या महोत्सवात पूर्ण सहभाग आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी काम करत आहोत.
या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठत, पर्पल फेस्ट २०२५द्वारे भारतात संयुक्त राष्ट्रसंघासमवेत एक ऐतिहासिक सहकार्यबंध सुरू होणार आहे. या धोरणात्मक भागीदारीची अधिकृत घोषणा संयुक्त राष्ट्रसंघाचे भारतातील निवासी समन्वयक शोम्बी शार्प यांनी नवी दिल्ली येथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभागृहामध्ये, गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांच्या उपस्थितीत केली.
आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करणे आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या दिव्यांगजनांसाठीच्या अधिकारांचे अधिवेशन (CRPD)मधील भेदभाव न करणे, पूर्ण आणि प्रभावी सहभाग, सुलभता आणि संधीची समानता या मूलभूत तत्त्वांशी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टचे दृष्टिकोन संलग्नित करणे, हे या सहकार्याचे उद्दिष्ट आहे. दिव्यांगजनांना समोर ठेवून, विविध स्तरांवर अर्थपूर्ण संवादाला चालना देणे; भारत आणि जागतिक स्तरावर समावेशक धोरणे आणि पद्धतींचा प्रसार व विकास करणाऱ्या नवोपक्रमांना चालना देणे हा या भागीदारीमागचा उद्देश आहे.