गोवा खबर

गोव्यातील मत्स्यव्यवसाय निल अर्थव्यवस्थेला योगदान देतो : हळर्णकर

Published

on

Spread the love

गोवा खबर : मत्स्योध्योग मंत्री नीलकंठ हळर्णकर यांनी गोव्यातील मच्छिमारी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची आणि देशातील नील अर्थव्यवस्थेत योगदान देण्याची प्रचंड क्षमता आहे असे सांगितले. ते आज सासष्टी येथील कुडतरी येथे मत्स्योध्योग संचालनालयाने राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

हळर्णकर यांनी  गोवा हे सागरी संवर्धन धोरण लागू करणारे पहिले राज्य मानले जाते, ज्याचा उद्देश शाश्वत मत्स्यपालन पद्धतींद्वारे मच्छिमारीचे उत्पादन वाढविणे असा आहे असे ते म्हणाले. गोव्यातील मच्छिमारी समाजासाठी, मासेमारी हा केवळ एक व्यवसाय नाही तर तो गोव्यातील परंपरा आणि संस्कृतीशी खोल आणि मजबूत संबंध दर्शवितो असे मंत्री म्हणाले.

राष्ट्रीय मत्स्यपालन दिन हा डॉ. हिरालाल चौधरी आणि डॉ. खालिकुन्ही यांच्या ऐतिहासिक कामगिरीचे स्मरण करतो. त्यांनी १९५७ मध्ये भारतीय प्रमुख कार्प माशांचे यशस्वीरित्या प्रजनन केले ज्यामुळे देशात अंतर्गत मत्स्यपालनात क्रांती घडली. या दूरदर्शी संशोधनामुळे गोव्यात मत्स्यपालन पद्धतींना चालना मिळाली आणि राज्यातील मत्स्य उत्पादनात वाढ झाली.

राज्यातील प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल हळर्णकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे कौतुक केले.

कुडतरीचे आमदार आलेक्सो रेजिनाल्डो लॉरेन्स यांनी मच्छिमारी समुदायांना सर्व अडचणींना तोंड देऊनही मत्स्यपालनात सातत्य राखण्याचे आवाहन केले. खाजन शेतांची लागवड करणे आवश्यक आहे कारण ते मत्स्यपालन प्रभावीपणे प्रसारित करण्यास मदत करते असे ते म्हणाले. पारंपारिक मच्छिमारी आणि नवीन मत्स्यपालन पद्धतींमध्ये सहभागी असलेल्या मच्छिमारी समाजाच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

मत्स्योध्योग सचिव प्रसन्ना आचार्य, आयएएस यांनी सरकारी यंत्रणा आणि मच्छिमारी समाजाच्या समान सहभागामुळे गोव्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचे भविष्य खूप आशादायक आहे. नीलक्रांतीमध्ये योगदान देण्यासाठी मत्स्यव्यवसाय क्षेत्राला सर्वतोपरी सहकार्य करण्याची सरकारची वचनबद्धता त्यांनी सांगितली.

मत्स्योध्योग संचालक डॉ. शमिला मोंतेरो यांनी गोव्यात राबविल्या जाणाऱ्या विविध मत्स्यपालन पद्धतींबद्दल माहिती दिली ज्यामध्ये मत्स्यपालनाच्या नवीन ट्रेंडद्वारे यावर्षी ४०० टन मत्स्य उत्पादन साध्य करता येईल असे त्या म्हणाल्या.

याप्रसंगी पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विविध मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. याशिवाय, कासवांच्या प्रजातींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात योग्य आणि सुरक्षितपणे आणल्याबद्दल मत्स्यपालन कर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कुडतरीचे सरपंच, जोकिम एस्तिबेरो यांनी भाषण केले. उपसंचालक डॉ. स्मिता मजुमदार आणि उपसंचालक चंद्रकांत वेळीप उपस्थित होते. मत्स्य शेतकऱ्यानी यावेळी त्यांचे अनुभव सांगितले. वर्षा मळिक चंदगडकर यांनी सूत्रसंचालन केले.

Trending

Exit mobile version