गोवा खबर : फोंडवे-रायबंदर परिसरात अतिक्रमण करून उंच संरक्षण भिंत उभारल्याप्रकरणी माजी आयएएस अधिकारी सुभाष चंद्र यांना पणजी महानगरपालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. चंद्र यांच्यावर शेजाऱ्याच्या जागेत घुसखोरी करून अनधिकृत बांधकाम केल्याचा गंभीर आरोप आहे.
माहितीनुसार, चंद्र यांनी सेवानिवृत्तीनंतर रायबंदर येथे घर विकत घेतले. मात्र, त्यानंतर त्यांनी मंजूर मर्यादेपेक्षा अधिक उंचीची संरक्षण भिंत बांधल्याने शेजाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी ६ जुलै रोजी बैठक घेऊन त्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे मनपाने तातडीने दखल घेत ही कारवाई केली.
विशेष म्हणजे २०१३ साली या भूखंडासाठी १.५ मीटर संरक्षण भिंतीच्या बांधकामास परवाना दिला गेला होता. मात्र, सदर अंमलबजावणीत उल्लंघन झाल्याचा स्पष्ट आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाकडून आता पुढील कायदेशीर टप्पे राबवले जाण्याची शक्यता आहे.