गोवा खबर : चिखल कालो २०२५ महोत्सव आज श्री देवकी कृष्ण मंदिर, माशेल येथे संपन्न झाला. या बहुप्रतिक्षित चिखल खेळानिमित्त शेकडो भाविक, पर्यटक, तरुण आणि कुटुंबे श्रद्धा, वारसा आणि निसर्गाच्या आनंदोत्सवात सहभागी होण्यासाठी एकत्र आली. द्वादशीच्या दिवशी झालेल्या समारोपाला पारंपारिक खेळ, भक्तीगीत आणि भगवान श्रीकृष्णाची पृथ्वीशी असलेल्या खेळकर बंधाची पुनर्कल्पना करणाऱ्या, चिखलातील प्रतीकात्मक खेळांद्वारे यात उत्साही सहभाग दिसून आला.
श्री देवकी कृष्ण मंदिराचे मैदान चिखलातील चेंडू फली, कुश्ती आणि इतर पारंपारिक खेळांच्या उर्जेने सजीव झाले. सहभागींनी एकत्रितपणे हास्याच्या वातावरणात परमेश्वराचा दिव्य खेळ (लीला) साजरा केला. उत्साही प्रेक्षकांनी, उत्सवी वातावरणात दहीहंडीचा आनंद शिगेला पोहोचवला. या संपूर्ण अनुभवामुळे भक्ती, सामुदायिक बंध आणि मान्सूनबद्दल कृतज्ञता या मूलभूत मूल्यांना बळकटी मिळाली, ज्यांनी पिढ्यानपिढ्या या उत्सवाला आकार दिला आहे.
माननीय पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या उत्सवात सक्रिय भाग घेतला. त्यांनी सांगितले, की “ही आपली लोक परंपरा आहे आणि ती जगासमोर सादर करण्याची वेळ आली आहे. चिखल कालो दरम्यान, लोक उत्सव साजरा करण्यासाठी, खेळण्यासाठी आणि मातीशी पुन्हा जोडण्यासाठी एकत्र येतात. अशा परंपरा जपणे आणि त्या भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे. पूर्वी, गोवा प्रामुख्याने येथील समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखला जात असे. आज, आम्ही अभिमानाने ‘गोवा बियॉन्ड बीचेस’चा प्रचार करत आहोत. अशा प्रकारच्या उत्सवांना सरकारी पाठिंबा देऊन आम्ही स्थानिक समुदायांसाठी आर्थिक संधी देखील निर्माण करत आहोत. गेल्या तीन वर्षांत, चिखल कालोला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. माझा विश्वास आहे, की प्रत्येकाने या उत्सवाचा भाग व्हावे आणि एकतेचा संदेश पसरवण्यास मदत करावी.”
या उत्सवात फोटोग्राफी आणि रील मेकिंग स्पर्धा देखील घेण्यात आली, ज्याने सहभागींना चिखल कालो २०२५च्या उत्साही साराचे दस्तऐवजीकरण करण्यास प्रोत्साहित केले. या प्रवेशिकांनी उत्सवाची खेळकरता, रंग आणि भावना टिपल्या व आपल्या परंपरेला नवीन काळातील कथाकथनाच्या दृष्टिकोनाने सादर केले.
गेल्या तीन दिवसांत या ठिकाणी अध्यात्म, संगीत, संस्कृती आणि सामुदायिक एकत्रीकरण दिसून आले आहे. पहिल्या दिवशी भावपूर्ण अभंग आणि कीर्तन गायनापासून ते आषाढी एकादशी (दिवस २) दिवशी भक्तीपूर्ण भजन सादरीकरणापर्यंत तसेच आजच्या उत्साही चिखल खेळांमध्ये ‘चिखल कालो २०२५’ हा गोव्याच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक खोलीचा उत्सव म्हणून सादर झाला.
गोवा पर्यटन, पुनरुत्पादित पर्यटनाच्या त्यांच्या दृष्टिकोनातून, गोव्याच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब दाखविणाऱ्या आणि समुदाय सहभाग मजबूत करणाऱ्या उत्सवांना, पाठिंबा देण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करतो. सर्व वयोगटातील लोकांचा सहभाग, तसेच अभ्यागत व डिजिटल प्रेक्षकांकडून वाढती आवड ही प्रामाणिक, स्थानिक आणि समावेशक अनुभवांसाठी विकसित होत असलेली भूक अधोरेखित करते.
या वर्षीच्या उत्सवाचा पडदा खाली येत असताना, चिखल कालो आपल्याला एकत्र येण्याची, उन्नतीची आणि प्रेरणेच्या परंपरेची शक्ती आठवून देत आहे. या उत्सवाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे, की खरा उत्सव केवळ विधींमध्ये नसून आनंद, भक्ती आणि एकमेकांशी तसेच आपल्या भूमीशी असलेल्या संबंधांच्या सामायिक क्षणांमध्ये आहे.