गोवा खबर

माय भारत 2.0 मंच विकसित करण्यासंदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी

Published

on

Spread the love

गोवा खबर : देशातील युवकांच्या डिजिटल सहभागाला बळकटी आणण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत केंद्रित युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने (एमवायएएस) केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (एमईआयटीवाय) आधिपत्याखालील डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनशी (डीआयसी) सामंजस्य करार केला आहे.

माय भारत 2.0 मंचाच्या विकसनासाठी झालेल्या या करारावर आज नवी दिल्ली येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हा अद्ययावत राष्ट्रीय युवा मंच देशभरातील तरुण वर्गाला सक्षम करण्यासाठी आणि त्यांना जोडून घेण्यासाठी तंत्रज्ञान-चलित उपायांचा वापर करेल. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच श्रम आणि रोजगार विभागाचे  मंत्री डॉ.मनसुख मांडवीय, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, रेल्वे तसेच माहिती आणि प्रसारण विभाग मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत या  करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.

सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर, माय भारत 2.0 ची निर्मिती करण्यासाठी माय भारत मंचामध्ये व्यापक अद्यतने करण्यात येतील. ही सुधारित आवृत्ती वापरकर्त्यांना अधिक उत्तम अनुभव, उपलब्धता तसेच कार्यक्षमता पुरवण्याच्या उद्देशाने नव्या सुविधांसह सुसज्ज असेल. व्यापक प्रमाण तसेच लवचिकता यांची सुनिश्चिती करण्यासाठी मोड्युलर रचनात्मक दृष्टीकोनाचा वापर करून हा मंच संपूर्णतः नव्याने उभारण्यात येणार आहे. त्याशिवाय, अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही प्रणालींसाठी अनुकूल ठरणाऱ्या एका संपूर्णतः कार्यक्षम मोबाईल अॅपचे देखील विकसन करण्यात येणार आहे.

याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडवीय म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना दिशा, हेतू आणि संधीसह सक्षम करण्यासाठी एकाच ठिकाणी उपाय स्वरुपात माय भारतची कल्पना केली आहे. माय भारत 2.0 ही एक खिडकी डिजिटल परिसंस्था असून ती सेवा भावाच्या उर्जेने युक्त असलेल्या कारकीर्द घडवण्याच्या संधी, कौशल्य विकास तसेच नागरी सहभागासह युवा नागरिकांसाठी अनुकुल ठरते. यापूर्वीच नोंदणी केलेल्या 1.75 कोटी युवकांसह, हा मंच म्हणजे 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या मोहिमेशी युवा आकांक्षांना जुळवून घेण्याची एक चळवळ आहे. माय भारत 2.0 सह आपण युवा आकांक्षांना विकसित भारताच्या पायाचे रूप देण्यासाठी अधिक उत्तम एकात्मता, सखोल सहयोग आणि एका नव्या धाडसी दिशेने निघालो आहोत.”

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, तरुण हे आपले नेते आणि राष्ट्र निर्माते आहेत. गेल्या 11 वर्षांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांसाठी विविध क्षेत्रांमध्ये – मग ते क्रीडा क्षेत्र असो किंवा तंत्रज्ञान, विविध संस्था असो किंवा शिक्षण प्रणाली- अशा सर्वच क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणले आहे.

माय भारत (https://mybharat.gov.in) हे युवा व्यवहार विभाग (DoYA) द्वारे संकल्पित आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) अंतर्गत डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन (DIC) द्वारे विकसित केलेले एक सक्रिय आणि गतिमान तंत्रज्ञानाधिष्ठित व्यासपीठ आहे. हे व्यासपीठ भारतातील तरुणांना संरचित आणि अर्थपूर्ण पद्धतीने सहभागी करून घेण्यासाठी तसेच एकत्रित करण्यासाठी एक संस्थात्मक चौकट म्हणून काम करते. हे व्यासपीठ 31 ऑक्टोबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अधिकृतपणे सुरू करण्यात आले. माय भारत या व्यासपीठावर आतापर्यंत, 1.76 कोटींहून अधिक तरुण आणि 1.19 लाखांहून अधिक संस्थांनी नोंदणी केली आहे.

Trending

Exit mobile version