गोवा खबर : गोव्यात ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी, सरकारी सेवा मिळवण्यासाठी कित्येक वेळी दीर्घ प्रतीक्षा, वारंवार भेटी आणि कामाचे दिवस चुकवावे लागत होते. आज ही स्थिती बदलली आहे. गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स (आयटीई अँड सी) खात्याच्या ‘ग्रामीण मित्र’ या योजनेद्वारे, आवश्यक सार्वजनिक सेवा आता थेट नागरिकांच्या घरी पोहोचवल्या जात आहेत.
या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना प्रवासाच्या त्रासाशिवाय महत्त्वाची कागदपत्रे मिळवणे आणि सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे झाले आहे.
दुर्गम आणि ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित करून, ग्रामीण गोव्यातील सामाजिक आणि आर्थिक विकासात योगदान देताना, ग्रामीण मित्र डिजिटल अंतर कमी करत आहेत.
निवासी दाखला, ईडब्ल्यूएस किंवा जात प्रमाणपत्रे मिळवणे असो, किंवा ज्येष्ठ कलाकारांसाठी कला सन्मान योजनेसाठी अर्ज करणे असो, पूर्वी यासाठी पंचायत आणि सरकारी कार्यालयांमध्ये अनेक वेळा भेटी द्याव्या लागत असत. या सेवा आता घरबसल्या मिळू लागल्या आहेत.
सांखळी येथील रहिवासी स्नेहा साळगावकर, जिने तिच्या वडिलांसाठी सेवेचा लाभ घेतला होता ती म्हणाली, पूर्वी आम्हाला वारंवार पंचायतीत जावे लागत असे आणि या प्रक्रियेला विलंब होत असे. आता ग्रामीण मित्रामार्फत कागदपत्रे आमच्याकडे येतात. यामुळे सर्व सुरळीत होत असून जीवन सोपे झाले आहे.
सांखळी येथील वृद्ध रहिवासी शीतल मळीक म्हणाल्या, मला चालता येत नाही, त्यामुळे सरकारी कार्यालयांना भेट देणे माझ्यासाठी शक्य नव्हते. ग्रामीण मित्रांचे आभार, कारण त्यांची टीम घरी आली आणि मला माझे जीवन प्रमाणपत्र मिळविण्यास त्यांनी मदत केली. हा अनुभव चांगला होता आणि यामुळे मला त्यांचा आधार वाटला.
ही सेवा सीएससी ई-गव्हर्नन्सद्वारे चालते आणि आठवड्याचे सातही दिवस सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या, समर्पित कॉल सेंटर (१४४७१) द्वारे ती समर्थित आहे. नागरिक डिजिटल अडथळ्यांना तोंड न देता सहजपणे या सेवांचा लाभ घेऊ शकतात, ज्यामुळे ती सर्वांसाठी उपलब्ध होते.
२०२४ मध्ये, सीएससीने (व्हीएलई) ग्रामीण मित्रामार्फत १.१५ लाखांहून अधिक सेवा विनंत्या नोंदवल्या. २०२५च्या मध्यापर्यंत २५,००० हून अधिक व्यवहार आधीच पूर्ण झाले आहेत, जे वाढता विश्वास आणि अश्या प्रकारच्या दारी मिळणाऱ्या प्रशासनाच्या वाढत्या मागणीचे प्रतिबिंब आहे.
पेडणेचे लाभार्थी नंदराज नाईक म्हणाले, मला माझे डायव्हर्जन्स आणि निवासी प्रमाणपत्रे दोन्ही सहजतेने मिळाली. ग्रामीण मित्राने आमचा वेळ वाचवला आहे आणि आम्हाला प्रशासनाशी अधिक सहजतेने जोडले आहे.
उत्तर ते दक्षिण गोव्यापर्यंत, ग्रामीण मित्र डिजिटल अंतर कमी करत आहेत आणि सार्वजनिक सेवा सर्वांसाठी समावेशक व सुलभ बनवत आहेत. यात जी नवीन गोष्ट आकार घेत आहे, ती डिजिटल नवोपक्रमापेक्षा अधिक आहे. यात प्रशासन सुलभ आणि दैनंदिन जीवनात अंतर्भूत होत आहे.
गोवा आयटी, स्टार्टअप्स आणि समावेशक नवोपक्रमाचे केंद्र म्हणून आपली ओळख निर्माण करत असताना, ग्रामीण मित्रासारखे उपक्रम हे प्रशासन कसे सोपे, अधिक प्रतिसादात्मक आणि लोकांच्या गरजांशी जुळत आहे, हे प्रदर्शित करतात.