गोवा खबर

खुशाल कल्याण यात्रेअंतर्गत राज्यपालांचा दक्षिण गोवा दौरा

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी आज “खुशाल कल्याण यात्रा” अंतर्गत श्री सातेरी शांतादुर्गा मंदिर, शेल्डे केपे, अवर लेडी ऑफ पुअर चर्च, तिळामळ आणि श्री दामोदर मंदिर, जांबावली येथे भेट दिली.

श्री सातेरी शांतादुर्गा मंदिरात राज्यपालांचे आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत आमदार आणि माजी मंत्री नीलेश काब्राल यांनी केले. यावेळी सरपंच कविता गावस देसाई, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धार्थ गावस देसाई, अध्यक्ष परेश गावस देसाई आणि सातेरी शांतादुर्गा मंदिराचे इतर समिती सदस्य उपस्थित होते. अध्यक्ष परेश गावस देसाई यांनी राज्यपालांचा शाल, श्रीफळ आणि देवतेची तसबीर अर्पण करून सत्कार केला.

तद्नंतर  राज्यपालांनी तिळामळ येथील अवर लेडी ऑफ पूअर चर्चला भेट दिली आणि प्रार्थना केली. त्यांच्या आगमनानंतर पॅरिश प्रिष्ट फादर आल्ड्रिन डी’कोस्टा आणि फादर एडेन फर्नांडिस आणि फादर डेनरिक डी’कोस्टा यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आमदार नीलेश काब्राल आणि नगरसेवक, सरपंच आणि पंचायत सदस्य उपस्थित होते.

पॅरिश प्रीष्ट फादर आल्ड्रिन डी’कोस्टा यांनी राज्यपालांना चर्चच्या कामकाजाची माहिती दिली आणि त्याना स्मृतिचिन्ह प्रदान केले.

जांबावली येथील ऐतिहासिक श्री दामोदर मंदिरात आगमन झाल्यावर राज्यपालांचे स्वागत समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई आणि देवस्थान समितीचे अध्यक्ष मंजुनाथ दुकळे यांनी केले. समितीचे इतर सदस्यही यावेळी उपस्थित होते.

खुशाल कल्याण यात्रेदरम्यान राज्यपालांनी भेट दिलेल्या सर्व प्रार्थनास्थळांवर प्रार्थना केली आणि गोव्यातील लोक आणि राष्ट्राच्या शांती, आनंद आणि कल्याणासाठी दैवी आशीर्वाद घेतले.

राज्यपालांनी आज भेट दिलेल्या सर्व पवित्र स्थळांना प्रत्येकी ५०,००० रुपयांचा धनादेश प्रदान केला.

राज्यपालांसोबत राज्यपालांचे सचिव संजीव गांवस देसाई, राज्यपालांचे विशेष अधिकारी मिहिर वर्धन, इतिहासकार संजीव सरदेसाई आणि राज्यपालांचे अधिकारी ए. कल्याण हर्ष आणि इतर मान्यवर होते.

Trending

Exit mobile version