गोवा खबर : सेंट थॉमस उच्च माध्यमिक विद्यालय ,हळदोणे येथे २६ जून रोजी आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी दिन (International Day Against Drug Abuse and Illicit Trafficking) साजरा करण्यात आला. या दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ, तंबाखू आणि दारूच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करणारा एक प्रभावी कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली. गोवा पोलिस खात्याचे सेवानिवृत्त डी.आय.जी बॉस्को जॉर्ज हे या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते. यावेळी प्राचार्य अँजेलिका फर्नांडिस, व्यवस्थापक फादर जेरार्ड सहायराज, एनएसएस कार्यक्रम अधिकारी अमरनाथ पणजीकर , युथ रेड क्रास अधिकारी नथाली प्रोएन्सा तसेच शाळेतील इतर शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
आपल्या मुख्य भाषणात बॉस्को जॉर्ज यांनी अंमली पदार्थ, तंबाखू व दारू यांचे गंभीर दुष्परिणाम सांगणारी पॉवर पॉइंट सादरीकरण केले. त्यांनी विद्यार्थ्यांना या घातक पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आणि असे पदार्थ कसे कुटुंब व भवितव्य उद्ध्वस्त करतात, हे स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्त समाजाचे राजदूत बनण्याचे आवाहन केले.
सदर कार्यक्रमात श्रृष्टी हळदोणकर आणि लायनल गुदिन्हो यांची सेंट थॉमस उच्च माध्यमिक विद्यालयाच्या “प्रहरी क्लब”चे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी शिस्त व सामाजिक जागरूकता वाढवण्याची जबाबदारी स्वीकारली.
कार्यक्रमाची सुरुवात शिक्षिका नथाली प्रोएन्सा यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. जेष्ठ शिक्षक अमरनाथ पणजीकर यांनी विद्यार्थी व शिक्षकांना अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा दिली . शिक्षिका जोसेफिन डिसोझा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर शिक्षिका सिल्वीया परेरा यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
या कार्यक्रमात आयवन डिक्रूझ व विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांचे दुष्परिणाम दर्शवणारे गीत सादर केले. तसेच अंमली पदार्थविरोधी पोस्टर स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
या उपक्रमाद्वारे शाळेने जबाबदार, सजग आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक नागरिक घडवण्याच्या आपल्या ध्येयावर पुनः एकदा ठाम भर दिला आहे.