गोवा खबर : दिव्यांग व्यक्तींचे अधिकारांचा प्रसार करणे आणि दिव्यांगजनांची यशोगाथा साजरी करणे यासाठी एकमेव प्रमुख व्यासपीठ म्हणून नावारूपला आलेला आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा २०२५ हा महोत्सव येत्या ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान गोव्यात आयोजित केला जात आहे.
गोवा सरकारच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग, राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय यांच्याद्वारे आयोजित आणि भारत सरकारचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय आणि युनायटेड नेशन्स इंडिया या संस्थांच्या सहकार्याने २०२५ सालच्या या महोत्सवामध्ये “सर्वसमावेशक विचार (थिंक इन्क्लुझिव)- सर्वांसाठी सुलभ, समावेशक रचना (युनिवर्सल डिझाईन)च्या माध्यमातून सर्वसमावेशकतेचा प्रसार” या संकल्पनेवर भर दिला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी गोवा मनोरंजन सोसायटी (ESG) अधिकृत स्थळ भागीदार आहे.
या उपक्रमाच्या प्रवेशनोंदणीचा प्रारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत; दिव्यांगजन सक्षमीकरण मंत्री सुभाष फळदेसाई; दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे सचिव प्रसन्ना आचार्य, आयएएस; राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण आयुक्त गुरुप्रसाद पावसकर; दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या संचालक वर्षा नाईक; आणि राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे सचिव ताहा हाझिक यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५– गोवा या महोत्सवासाठी नोंदणी केवळ आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा मोबाइल अॅपवरच केली जात आहे. अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले हे अॅप https://purplefest.goa.gov.in/ या वेब लिंकद्वारे डाउनलोड करता येते. इच्छुकांनी लवकर नोंदणी करण्यचे आवाहन आयोजकांद्वारे केले जात आहे. नोंदणी केलेल्या प्रतिनिधींना अॅपद्वारे महोत्सवाचे वेळापत्रक, स्थळ तपशील आणि इतर विशेष माहिती उपलब्ध केली जाणार आहे.
यंदाच्या महोत्सवामध्ये सर्वसमावेशक दृष्टिकोन, सर्वसमावेशक विचारसरणी ही संकल्पना ठळकपणे सादर केली जाणार आहे. सर्वांसाठी वापरसुलभ जागा, उत्पादने, तंत्रज्ञान आणि सेवा निर्मिती करणे या विचाराचा प्रसार या परिषदेतून केला जाणार आहे. शाळांमध्ये इन्क्लुझिव्ह एज्युकेशचा प्रचार व प्रसार, आणि रुग्णालयांमधील स्पष्ट व सहजपणे माहिती देणारे फलक यापासून दृष्टिदोष असलेल्यांसाठी उपयुक्त वेबसाइट पर्यंत विविध उत्पादने, सेवा, तंत्रज्ञान विकासामध्ये सर्वसमावेशक रचनाकृती (युनिव्हर्सल डिझाईन)च्या माध्यमातून प्रत्येकासाठी सहजता आणि समावेशकता सुनिश्चित करता येते. व्यापक विचारातून तसेच युनिवर्सल डिझाईनमुळे कोणीही मागे राहणार नाही, हा विचार या परिषदेतून ठळकपणे मांडण्याचे आयोजकांचे उद्दिष्ट आहे.
सावंत म्हणाले, पर्पल फेस्ट हा महोत्सव एक असे व्यासपीठ ठरत आहे जिथे प्रत्येक व्यक्तीच्या मताला, विचाराला महत्व दिले जाते. यंदाच्या महोत्सवात सर्वसमावेशक रचनाकृती (युनिव्हर्सल डिझाइन)वर लक्ष केंद्रित करून, सर्वसमावेशकतेचा विचार हा केवळ उद्दिष्टपूर्ततेपुरता सीमित न ठेवता, या ध्यासातून प्रत्येक नागरिकाला दैनंदिन आयुष्याचा आनंद सुलभ, सहजपणे घेता येईल अशा पूरक रचना-सुविधा विविध उत्पादने, सेवा, तंत्रज्ञानमध्ये आणण्याचे तत्वज्ञान म्हणून नव्याने परिभाषित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. दिव्यांग व्यक्तींबद्दलची आपली वचनबद्धता धोरणाच्या पलीकडे जात व्यावहारिक उपाययोजनांमध्ये विस्तारित झाली पाहिजे. युनिव्हर्सल डिझाइनद्वारे, आम्ही महानगरांपासून ते अगदी छोट्या गावापर्यंत प्रत्येक स्तरावर सर्वसमाशेकतेचा हा बदल घडवू पाहत आहोत.
पर्पल फेस्ट २०२५ चे एक अनोखे आकर्षण म्हणजे ग्रामीण समावेशनावर भर हे होय, अशी माहिती दिव्यांगजन सक्षमीकरण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. ते म्हणाले, गावांमध्ये आरोग्य, शिक्षण आणि प्रवास सेवा यांच्या सुलभ उपलब्धेत मर्यादा असल्याने दिव्यांग व्यक्तींना विविध आव्हानांचा सामना करावा लागतो याची आम्हाला जाणीव आहे. या महोत्सवामध्ये विशेष सत्रे आणि ग्रामीण समावेशन परिषद आयोजित करून ग्रामीण भागातील या समस्यांवर प्रकाश टाकण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच तळागाळातील लोकांचे विचार, अपेक्षा ऐकणे, त्यांचे वास्तव अनुभव समजून घेणे आणि यावर व्यावहारिक आणि विस्तारक्षम अशा उपाययोजनांचा शोध घेणे यासाठी एक प्रभावी व्यासपीठ या महोत्सवातून सादर करण्याचा आमचा उद्देश आहे.
आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट या महोत्सवाचे महत्व केवळ कार्यक्रमापुरते मर्यादित नाही, तर हा उपक्रम आता एक सकारात्मकतेची, समावेशकतेची चळवळ बनला आहे, अशी भावना राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, या व्यासपीठावर विविध क्षेत्रातील लोकांचे प्रत्यक्ष अनुभव सादर होतात, जाणून घेता येतात आणि या व्यासपीठावरील विचारमंथन शहरी सीमा ओलांडून सामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याशी जोडले जाते. या महोत्सवात मांडले जाणारे विचार हे आपल्याला समावेशक, प्रतिसादात्मक आणि वास्तविक गरजांना उपयुक्त अशी ध्येयधोरणे बनवण्यासाठी दिशादर्शक ठरतील.
यंदाची संकल्पना ठळकपणे सर्वांपर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने, आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५मध्ये युनिव्हर्सल डिझाइनच्या वास्तविक अवलंबाबाबत जगभरातील अनुभव विविध संवाद उपक्रम व प्रदर्शनांतून मांडले जाणार आहेत.यासाठी खास विकसित युनिव्हर्सल डिझाइन पॅव्हेलियनमध्ये विविध प्रकारच्या भौतिक पायाभूत सुविधा, वाहतूक सेवा, शिक्षण सेव आणि बँकिंग सेवा या सर्वांसाठी सुलभ, सहजपणे वापरता येतात आणि त्यातून सर्वसामान्यांचे जीवन कसे सुकर बनते हे अनुभवायला मिळणार आहे. तसेच सार्वजिनिक ठिकाण अधिक सर्वसमावेशक अधिक सुलभ कसे होईल यासाठी प्रभावी कल्पना जगासमोर मांडण्याची संधी विद्यार्थी आणि सर्जनशील व्यक्तींना डिझाइन फॉर ऑल चॅलेंज या स्पर्धेतून मिळणार आहे.
या महोत्सवात विशेष ग्रामीण समावेशन परिषदेचेही आयोजन केले जाणार आहे. ग्रामीण भागातील व्यक्तींना त्यांचे अनुभव आणि नाविन्यपूर्ण कल्पना सादर करण्यासाठी ही परिषद एक प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे. प्रत्येक नागरिकासाठी समावेशक जीवन जगता यावे यासाठी व्यावहारिक उपाययोजना सादर करता येतील, जाणून घेता येतील, नवे काही शिकता येईल हा या परिषदेमागचा उद्देश आहे. त्याचबरोबर, जागरूकता वाढवणे, सहकार्य वाढवणे, नेतृत्वविकास, रोजगारसंधी निर्मिती आणि दिव्यांग व्यक्तींसाठी पुरोगामी धोरणनिर्मिती ला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या परिषदेतून केला जाणार आहे. तसेच नवकल्पनांना प्रकाशझोतात आणणे, नवीन भागीदारींना चालना देणे आणि सर्जनशीलता, आनंद आणि सामूहिक सहभाग वाढवणे यासाठी एक सक्षम व्यासपीठ या महोत्सवातून उपलब्ध होणार आहे.
प्रत्येक आवृत्तीप्रमाणे, आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५मध्येही विविध पर्याय उपलब्ध असतील आणि त्यामुळे हा उपक्रम अद्वितीय ठरतो. पर्पल थिंक टँकमध्ये विवध क्षेत्रांतील तज्ञ एकत्र येऊन नवनव्या युनिव्हर्सल डिझाइनचा शोध घेतील आणि विविध क्षेत्रांमध्ये अशा रचनांचा वापर करण्यासाठी ऊहापोह करतील. पर्पल कॉन्फरन्समध्ये शासकीय धोरण, ग्रामीण समावेशन आणि समुदाय नेतृत्व विकास यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात येईल.