गोवा खबर : गोव्यात राबवण्यात येत असलेल्या ‘स्वस्थ महिला, स्वस्थ गोवा’ या उपक्रमाचा थेट फायदा राज्यातील महिलांना मिळत असून आतापर्यंत ७३ महिलांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. ही माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.
राज्यात आतापर्यंत १ लाख ६५ हजारांहून अधिक महिलांची स्तन कर्करोग चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये ३,३७८ संशयित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ७३ महिलांमध्ये लवकर निदान झाल्यामुळे वेळेवर उपचार सुरू करता आले.
या योजनेअंतर्गत वापरण्यात येणारी ‘आय ब्रेस्ट एक्झाम’ (IBE) पद्धत ही अत्याधुनिक असून पूर्णपणे वेदनारहित, नॉन-इनवेसिव्ह आणि रेडिएशनमुक्त आहे. त्यामुळे कर्करोगाचे लवकर निदान शक्य होते, असे राणे यांनी नमूद केले.
‘आरोग्य सर्वांसाठी’ या उद्दिष्टाकडे वाटचाल
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आरोग्य सर्वांसाठी’ हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट केली जात आहे.
या उपक्रमाचा उद्देश केवळ तपासणीपुरता मर्यादित नसून महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना वेळेत उपचार उपलब्ध करून देणे हेही त्यामागे आहे.
मोफत आरोग्य शिबिरांची मालिका सुरू
राज्यभरातील ग्रामीण व दुर्गम भागांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवण्यासाठी मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, हा आमचा संकल्प आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.