गोवा खबर

मोपा विमानतळावर ब्ल्यू कॅब टॅक्सी काऊंटर पुन्हा सुरू होणार : मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Published

on

Spread the love

गोवा खबर : मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांचा ‘ब्ल्यू कॅब’ काऊंटर गेल्या दोन महिन्यांपासून बंद होता. या पार्श्वभूमीवर टॅक्सी व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सचिवालयात भेट घेतली.

या वेळी मुख्यमंत्र्यांनी शुक्रवार किंवा सोमवारी वाहतूक खात्याच्या माध्यमातून काऊंटर सुरू करण्याची ग्वाही दिली.

या निर्णयामुळे दोनशेहून अधिक टॅक्सी व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत २०० व्यावसायिकांना परवाने मिळाले असून आणखी ८० परवाने लवकरच दिले जाणार आहेत, अशी माहिती सरपंच तुळशीदास गावस यांनी दिली.

व्यावसायिकांनी याआधी खासदार सदानंद तानावडे यांनाही निवेदन देऊन प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. काऊंटर बंद असल्यामुळे अनेक टॅक्सी चालकांना प्रवासी मिळत नव्हते आणि गाडीसाठी घेतलेली कर्जे फेडण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनामुळे आता हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता असून व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Trending

Exit mobile version