गोवा खबर

पर्यटन खात्याने वार्का समुद्रकिनाऱ्यावरील सीआरझेड उल्लंघनाची घेतली दखल

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने वार्का समुद्रकिनाऱ्यावर बेकायदेशीर क्रियाकलापांशी संबंधित घटनेची गंभीर दखल घेतली आहे. खात्याकडे १८/०६/२०२५ रोजी सादर केलेल्या व्हिडिओ क्लिपिंगमध्ये एक वाहन (जेसीबी) अनधिकृत वाळू उपसा आणि नैसर्गिक साठ्यामध्ये बदल करत असताना आढळून आले आहे. पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ आणि गोवा पर्यटन स्थळे संरक्षण आणि देखभाल कायदा, २००१ अंतर्गत जारी केलेल्या कोस्टल रेग्युलेशन झोन (सीआरझेड) अधिसूचनेनुसार या कृतीला सक्त मनाई आहे.

ही बेकायदेशीर कृती म्हणजे पर्यावरणीय नियमांचे स्पष्टपणे केलेले उल्लंघन आहे. त्यामुळे पर्यटन खात्याने हे प्रकरण गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (जीसीझेडएमए) आणि कोलवा पोलिस स्टेशनकडे पाठवले आहे.

या विषयावर भाष्य करताना, पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले, गोव्याच्या किनारपट्टी आणि नैसर्गिक वारशाच्या संरक्षणासाठी खाते वचनबद्ध आहे. विशेषतः संवेदनशील किनारपट्टी क्षेत्रात, पर्यावरणाला हानी पोहोचवणारी कोणतीही कृती खपवून घेतली जाणार नाही. कायद्यानुसार या विरोधात कठोर कारवाई केली जाईल.

खात्याने संबंधित अधिकाऱ्यांना उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध योग्य, कायदेशीर आणि नियामक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत, याची खात्री करण्याचे आवाहन केले आहे.

Trending

Exit mobile version