गोवा खबर

राज्य चित्रपट महोत्सव १४ ऑगस्टपासून : एकत्रितपणे तीन आवृत्त्यांचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा मनोरंजन संस्था आणि माहिती व प्रसिद्धी खात्याच्या संयुक्त विद्यमाने १४ ते १७ ऑगस्ट २०२५ दरम्यान राज्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यावर्षी एकत्रितपणे १०वी, ११वी आणि १२वी आवृत्ती साजरी होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन १४ ऑगस्ट रोजी होईल आणि समारोप १७ ऑगस्टला होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेस ईएसजीचे उपाध्यक्ष आमदार डिलायला लोबो, सीईओ अश्विन चंद्र आणि शर्मद रायतूरकर उपस्थित होते. मागील तीन वर्षांपासून काही कारणांमुळे महोत्सव होत नव्हते. त्यामुळे यंदा २०१८ ते २०२३ या कालावधीत तयार झालेल्या चित्रपटांचा समावेश करण्यात येणार आहे:

10वी आवृत्ती: 10 जानेवारी 2018 – 31 डिसेंबर 2019

11वी आवृत्ती: 1 जानेवारी 2020 – 31 डिसेंबर 2021

12वी आवृत्ती: 1 जानेवारी 2022 – 31 डिसेंबर 2023

शॉर्ट फिल्म स्पर्धा महोत्सवाआधी

मेकॅनिझ पॅलेस व आयनॉक्स (पणजी) येथे सर्व चित्रपट दाखवले जातील. महोत्सवाच्या पूर्वसंध्येला ४८ तासांत शॉर्ट फिल्म तयार करण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये विषय महोत्सवाच्या दरम्यान दिला जाईल आणि निवडक चित्रपट महोत्सवात दाखवले जातील.

बक्षिसे पुढीलप्रमाणे असतील:

प्रथम पुरस्कार – ₹२५,०००

द्वितीय पुरस्कार – ₹२०,०००

इतर वैयक्तिक पारितोषिके

महोत्सवाचे विभाग आणि पुरस्कार

चित्रपटांचे दोन प्रमुख विभाग असतील — फिचर फिल्म आणि नॉन फिचर फिल्म.

फिचर फिल्म विभागात मराठी आणि कोंकणी चित्रपटांचे स्वतंत्र सादरीकरण होईल.

नॉन फिचर विभागात दोन्ही भाषेतील चित्रपट दाखवले जातील. यासोबतच “इन कन्वर्सेशन”, मास्टरक्लास, मार्केट चर्चासत्र, नॉलेज सिरीज यांसारखी सत्रेही होणार आहेत.

मुख्य पुरस्कार पुढीलप्रमाणे:

फिचर फिल्मसाठी उत्कृष्ट चित्रपट:

प्रथम पुरस्कार – ₹५ लाख

द्वितीय पुरस्कार – ₹३ लाख

उत्कृष्ट दिग्दर्शन:

प्रथम – ₹५०,०००

द्वितीय – ₹३५,०००

अभिनय, कथा, पटकथा, संवाद, संगीत दिग्दर्शन आदींसाठी २५,००० रुपयांची २१ बक्षिसे

नॉन फिचर विभागातही ७ विशेष बक्षिसे दिली जातील

चित्रपट अनुदानासाठी अर्ज प्रक्रियेची माहिती

गोमंतकीय निर्मात्यांसाठी असलेल्या चित्रपट अनुदान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया १८ ऑगस्टपासून सुरु होत आहे आणि एक आठवड्यापर्यंत अर्ज स्वीकारले जातील.

२०१६ ते २०२३ या कालावधीत तयार झालेल्या चित्रपटांसाठी ३० अर्ज आले असून, लवकरच त्यांची छाननी केली जाईल, असे उपाध्यक्षा डिलायला लोबो यांनी सांगितले. मूल्यांकन समितीच्या अहवालानंतर चित्रपटांना अनुदान मंजूर केले जाईल.

Trending

Exit mobile version